१५ जूनला घंटा वाजणार

शैक्षणिक वर्तुळात शालेय स्तरावर निकाल तयार करीत नव्या प्रवेशाच्या घडामोडी घडत असताना नाशिक  जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण विभागाचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा विद्यार्थ्यांना नैमित्तिक, प्रशासकीय, दीपावली व उन्हाळी अशा सर्व मिळून शाळांना ७६ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. याशिवाय सत्र कालावधी निश्चित करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा १५ जून रोजी वाजणार आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या संकेतानुसार माध्यमिक शाळांमधून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांतील शैक्षणिक सह शालेय सुट्टी जाहीर झाली आहे. त्यात प्रदीर्घ सुट्टीत १६ ते ३१ ऑक्टोबर अशी दीपावलीची १४ दिवस सुट्टी मिळणार आहे. सार्वजनिक व शासकीय सुट्टी १९ दिवस, विभागीय आयुक्त, नाशिक यांनी आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेत जाहीर केलेली तीन दिवसांची सुट्टी, मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करत तीन दिवस आणि २ मे ते १४ जून असे ३७ दिवस याप्रमाणे ७६ दिवसांच्या सुटय़ा जाहीर झाल्या आहेत. यामध्ये सत्रांचे नियोजन करताना प्रदीर्घ कालावधीनंतर नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा १५ जून रोजी होणार आहे. माध्यमिक शाळेचे आवार या दिवशी गजबजेल. १४ ऑक्टोबपर्यंत पहिले सत्र पूर्ण होणार असून द्वितीय सत्रास १ नोव्हेंबर रोजी सुरुवात होईल. या कालावधीत गणेशोत्सव किंवा नाताळची सुट्टी शाळेला जाहीर करायची असेल तर प्रदीर्घ सुट्टीत कपात करावी लागेल. तसेच नैसर्गिक किंवा अन्य काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शिक्षण विभागाशी चर्चा करीत त्याचे नियोजन करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.