विज्ञान म्हटले की डोळ्यासमोर न्यूटनच्या सिद्धान्तापासून सुरू झालेल्या चिकित्सेपासून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत लागलेले नवनवीन शोध आणि त्या मागील कल्पना विविध माध्यमातून समोर येत असल्या तरी विद्यार्थी दशेत मात्र या संकल्पना क्लिष्ट वाटतात. या पाश्र्वभूमीवर, मराठी विज्ञान परिषद नाशिक आणि मुंबई शाखा यांच्या वतीने ‘दर शनिवारी, विज्ञानवारी’ या उपक्रमाची आखणी झाली. या माध्यमातून २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पनावर आधारित प्रतिकृती, तक्ते, मनोरंजनात्मक खेळ तयार केले. विद्यार्थ्यांनी निमिलेल्या विज्ञान आविष्कार मंगळवारी विज्ञान प्रदर्शनातून समोर आला. हा उपक्रम महापालिकेच्या इतरही सर्व शाळांमध्ये राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विज्ञान दिनानिमित्त शहर व परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मराठी विज्ञान परिषदेच्या पुढाकारातून आकारास आलेल्या ‘दर शनिवारी, विज्ञानवारी’ प्रकल्पातून साध्या सोप्या पद्धतीने विज्ञान शालेय विद्यार्थ्यांपर्यत नेण्याच्या पथदर्शी प्रकल्पाचा पहिला टप्पा नाशिक येथे पार पडला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान साक्षर बनविणे आणि त्यांच्यात विज्ञान प्रयोगाविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने परिषदेने ‘दर शनिवारी विज्ञानवारी’ हा उपक्रम राबविला.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

महापालिकेच्या दहा आणि खासगी दोन अशा एकूण १२ शाळेतील इयत्ता सहावी व सातवीतील जवळपास २५० विद्यार्थ्यांना विज्ञानाचे शिक्षण देण्यात आले. या उपक्रमाने मुले प्रयोगशील झाली असून शाळेत विविध विषयांवर व्यक्त होण्यास सुरूवात झाली. मुलांच्या गैरहजेरीचे प्रमाण कमी झाले. वेगवेगळ्या प्रयोगशील उपक्रमात ते सहभागी होत असल्याने हा उपक्रम सर्वच शाळांमध्ये सुरू व्हावा या दृष्टीने महापालिका शिक्षण मंडळ प्रयत्न करत आहे. मंगळवारी सिडकोतील गणेश चौक येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ११/१०५ मध्ये विद्यार्थ्यांच्या विज्ञान आविष्काराचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचे उद्घाटन मविप्र शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते झाले. तर  प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्यासह नाशिक व मुंबई विज्ञान परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, वर्षभरात विद्यार्थी ज्या मूलभूत संकल्पना शिकले, त्यावर आधारीत प्रयोग, प्रतिकृती, मनोरंजनात्मक खेळ त्यांनी तयार केले. यामध्ये हवेचा दाब, घनता, ध्वनी, चुंबकत्व, पंचेंद्रिय, त्या संदर्भातील शरीर मांडणी, प्रकाशाचे वेगवेगळे प्रयोग, गुरुत्वीय मध्य प्रयोग, तेंदुलम, यातील काही निवडक संकल्पनांवर आधारीत खेळ असे विविध प्रकल्प घरगुती साहित्य, मुलांच्या टाकाऊ खेळणीतून आकारास आले आहे.

तीन हजार विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे

सोशल नेटवर्किंग फोरम आणि एचपीटी महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ग्रामीण व आदिवासी भागातील अंधश्रद्धांचा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने मंगळवारी तीन हजार विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे देण्यात आले. हरसूल येथील केबीएच विद्यालयाच्या पटांगणावर हा कार्यक्रम झाला. माजी प्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी प्रात्यक्षिकांच्या मदतीने मुलांच्या मनातील भानामती, चेटूक, जादू, अंगात येणे यासारख्या तत्सम भंपक प्रकारांची भीती काढून टाकली. बुवा-बाजी अगरबत्ती फिरविणे, नारळ पेटवणे, हातातून रक्त काढणे, लिंब पेटवणे असे चमत्कार करून लोकांना भसवतात. ते हातचलाखीचे प्रयोग मुलांना करून दाखविल्याने आदिवासी भागातील विद्यार्थी प्रभावित झाले. दैनंदिन जीवनात विज्ञानाचा वापर होत असला तरी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान दिनाचा आधार घ्यावा लागतो, असे प्रमोद गायकवाड यांनी नमूद केले. एचपीटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविलेली वैज्ञानिक उपकरणे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. एका विद्यार्थ्यांने बनविलेला ड्रोण कॅमेरा सर्वाच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

 

विद्यार्थ्यांसह आमचीही परीक्षा

मराठी विज्ञान परिषद नाशिक व मुंबई शाखेने ‘दर शनिवारी, विज्ञानवारी’ हा उपक्रम राबविला. वर्षभर महापालिकेच्या १० शाळा व खासगी दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. विद्यार्थी, त्यांना प्रशिक्षण देणारे विज्ञान मित्र या दोघांमध्ये दुवा म्हणून काम करणारी मराठी विज्ञान परिषद यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ हे प्रदर्शन आहे. मुले खरंच काय शिकली या प्रश्नाचे उत्तर शोधतांना विज्ञान मित्र व परिषदेची परीक्षा आहे.

– अजित टक्के (मराठी विज्ञान परिषद, नाशिक शाखा)