प्रकट मुलाखतीत शरद पवार यांचे मनोगत 

विद्यमान सरकार उत्पादकांपेक्षा ग्राहकहिताकडे अधिक लक्ष देत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार काही करेल असे वाटत नाही. त्यासाठी आता सामुदायिक शक्ती उभी करण्याची गरज आहे. त्याकरिता आपण स्वत: पंधरा दिवसानंतर महाराष्ट्रात फिरणार आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे केली.

शरद पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी संसदीय कारकिर्दीचा गुणगौरव तसेच कायदेमंडळातील पाच दशकांच्या कार्याचा वेध घेणारी प्रकट मुलाखत असा कार्यक्रम रविवारी सायंकाळी येथील गंगापूर रस्त्याजवळील विश्वास लॉन्स येथे झाला. यावेळी मुलाखतीत प्रसिद्ध लेखक व पत्रकार अंबरीश मिश्र, निवेदक सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता बाळसराफ यांच्या विविध प्रश्नांना पवार यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. शरद पवार यांच्या अष्टपैलू कर्तृत्वाचा वेध या मुलाखतीत घेण्यात आला. तत्पूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विश्वास बँक आदींच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात शरद पवार यांचा जाहीर सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला.

देशपातळीवर नेतृत्व करण्यासाठी व्यक्तिगत गुण किंवा पात्रता पुरेशी नसते. त्यासाठी राजकीय शक्तीची गरज असते. त्यासाठी आवश्यक राजकीय संख्याबळ उभे करू शकलो नाही. राजकारणात वास्तवतेचे भान ठेवून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळेच  देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा विचार आपण मनातून काढून टाकला असल्याची भावनाही त्यांनी मांडली. काँग्रेसमध्ये असतांना महत्वाच्या प्रश्नांवर स्वच्छ भूमिका मांडली. त्याचे राजकीय दुष्परिणाम मात्र सहन करावे लागले, अशी कबुली पवार यांनी दिली.

राजकारण प्रवेशाची पाश्र्वभूमी मांडतांना यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे आदर्श महाविद्यालयीन जीवनात आपल्यासमोर होते. एक मे १९६० रोजी शिवनेरीवर यशवंतरावांनी उगवत्या महाराष्ट्राविषयीची भूमिका मांडली. ती भूमिका भावल्याने आपण राजकारणात आल्याचे नमूद केले. आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत मुख्यमंत्रिपदी असतांना झालेला लातूर, किल्लारीचा भूकंप आणि १९९३ तील मुंबईमध्ये घडलेले साखळी बॉम्बस्फोट या दोन घटना आव्हानात्मक होत्या, याचा उल्लेख त्यांनी केला. राजकीय कार्यकर्ते, नेत्यांकडून सत्ता व संपत्तीचे होणारे ओंगळवाणे प्रदर्शन, क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी असतांना केलेले कार्य, देशी खेळांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न या सर्वाचा उल्लेख पवार यांनी या मुलाखतीदरम्यान केला. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष विनायकदादा पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा आदी उपस्थित होते.