निफाडमध्ये शिवसेनेची बैठक

कर्जमाफीसंदर्भात शासनाने टाकलेल्या अटी अत्यंत जाचक असून त्यामुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याची व्यथा निफाड तालुका शिवसेना, युवासेनेच्यावतीने निफाड येथे आयोजित बैठकीत मांडण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे २५ जून रोजी निफाड तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून या पाश्र्वभूमीवर आमदार कदम यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व शिवसैनिकांची नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक शिवसैनिकांनी कर्जमाफीच्या निर्णयातील अटींचा उल्लेख केला. यावेळी शिवसेनेचा ५१ वा वर्धापनदिन शासकीय विश्रामगृहात उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन आ. अनिल कदम तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेनेच्या गौरवशाली ५१ वर्षांच्या वाटचालीची माहिती प्रास्ताविकात करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके यांनी दिली. उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाविषयीही यावेळी चर्चा करण्यात आली. कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी शासनाने जाचक अटी टाकल्या असून त्यामुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचे शरद कुटे, श्याम खालकर, बाळासाहेब वाघ, राजाराम दरेकर, शिवा सुरासे आदींनी नमूद केले. यावेळी शेतकरी संवाद दौऱ्यासाठी गटनिहाय बैठका घेण्याचे निश्चित करण्यात आले. अन्य पदाधिकाऱ्यांवर नियोजनाची जबाबदारी टाकण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांमुळेच शिवसैनिक नि:स्वार्थी भावनेने जनतेची कामे करतात, असे आमदार कदम यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची घोडदौड सुरु असून निष्ठावंत व कडवट शिवसैनिक हाच शिवसेनेचा ५१ वर्षांचा  गौरवशाली इतिहास आहे, असेही कदम यांनी सांगितले. बैठकीस जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, पिंपळगाव बसवंतचे ज्येष्ठ नेते भास्कर बनकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, पंचायत समिती सभापती पंडित आहेर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दीपक शिरसाठ, साहेबराव कदम, साकोरेचे सरपंच केशव बोरस्ते, अशोक निफाडे, जगन ढोबळे, संपत डुंबरे, निफाडचे उपनगराध्यक्ष जावेद शेख आदी उपस्थित होते.