व्यापाऱ्यांचा शहरात काळी फित लावून मूक मोर्चा; शिवसेनेचा ८ मार्चपासून उपोषण करण्याचा निर्णय

शहरातील सरकारी कार्यालये पाच किलोमीटरवरील प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय कृती समिती व व्यापारी महासंघ यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या कळवण बंदला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या निर्णयाविरोधात आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवत व्यापाऱ्यांनी शहरातून काळी फीत लावत मूक मोर्चा काढला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच प्रांताधिकारी डी. गंगाधरण यांच्या दालनात काळ्या फिती काढून निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. अत्यावश्यक सुविधा असलेल्या औषध विक्रेत्यांनीही बंदमध्ये सहभाग घेतला. शिवसेनेने निर्णयाविरोधात ८  मार्चपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

जनतेचा तीव्र विरोध असतानाही शहरापासून दूरवर असलेल्या कोल्हापूर फाटा येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, शेतकरी व व्यापाऱ्यांनी वारंवार या निर्णयास विरोध केला आहे, परंतु प्रशासनाकडून त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. त्या विरोधात व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवत निषेध केला आहे. सर्व व्यापारी व नागरिक हजारोंच्या संख्येने मूक मोर्चात सहभागी झाले होते. तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन देण्यात आले. वाणी मंगल कार्यालयात शहरातील सर्व व्यापारी ११ वाजता एकत्र आले. या ठिकाणापासून निघालेला मूक मोर्चा बस स्थानक, गणेशनगर, शाहीर लेन, सुभाष पेठ, मेनरोड, सावरकर चौक मार्गाने तहसील आवारात दाखल झाला. व्यापाऱ्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरीही सामील झाले होते.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी सुरुवातीपासून कार्यालय स्थलांतराचा घाट घातला जात असून, या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या वतीने ८ मार्चपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी या कार्यालय स्थलांतर विरोधात आपण जनतेसोबत असून या प्रशासकीय इमारतीत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांसह पालकमंत्र्यांना भेटणार असून सर्व कार्यालय कळवण शहरातच ठेवावीत यासाठी प्रत्नशील असल्याचे सांगितले. भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष गोविंद कोठावदे, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पगार, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिलीप निकम आदींनीही मोर्चाला पाठिंबा दिला. माकपचे सरचिटणीस हेमंत पाटील यांनी कार्यालय स्थलांतराविरोधात सर्व पक्ष मतभेद विसरून एकत्र लढा देत असल्याचे नमूद केले.  आ. जे. पी. गावित या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहनलाल संचेती यांनी प्रशासनाला यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊनही दखल घेतली न गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यापुढेही हा लढा सनदशीर मार्गाने दिला जाईल. व्यापारी महासंघाचे संचालक दीपक महाजन यांनी हा लढा केवळ व्यापारी वर्गाचा नसून याची झळ सर्वसामान्यांनाही बसणार असल्याचा धोका मांडला. तहसीलदार अनिल पुरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना शासनास कळविण्याचे आश्वासन दिले.