शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवले असतानाच आता सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अन्यथा सरकारमधून बाहेर पडू, असा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. नाशिकमधील मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली. शेतकरी कर्जमाफीला विरोध करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे ‘परिवर्तन’ एका अभ्यासू विद्यार्थ्यात झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सत्तेत आलो म्हणून भाषा बदलणारे आम्ही नाहीत. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही करंटे नाहीत, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. आमचे सर्व मंत्री राजीनामे देऊन सत्ता सोडतील, असे आव्हान देऊन त्यांनी शेतकरी कर्जमाफी केल्यास आम्ही बाहेरून पाठिंबा देतो, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:

– राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

-शेतकरी रडणार नाही तर रडवणार

-सांगलीच्या विजय जाधव या शेतकऱ्यावर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अस्थी गोळा करू करून राज्यात फिरण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती कोणी आणली?

-शेतीचे मॅपिंग करणार आहेत. म्हणे, यातून कोणी किती पीक काढले हे कळेल. मग यातून होणारे घोटाळे बाहेर येतील. माझा शेतकरी घोटाळेबाज वाटला का?

-सत्ता मिळूनही भाजप समाधानी नाही.

-आम्ही सत्तासूर आणि शेतकरी चिंतातूर

-भाजप सरकार स्विस बँकेतील पैशांतून देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार होते. काय झाले?

– बुलेट ट्रेनचा उपयोग काय?

-नोटाबंदीचा त्रास शेतकऱ्याला झाला. काळा पैसा नको म्हणून जिल्हा बँका बंद केल्या. राष्ट्रीय बँकांतून काळा पैसा आला. मग त्याही बंद करण्याची हिंमत दाखवणार का?

-कर्जमुक्ती जमत नसेल तर १५ लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात टाका

-कर्जमाफी, समृद्धी महामार्गाचा प्रश्न असो, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.

-या अभियानाचे आंदोलनात रुपांतर झाले तर राज्यात वणवा पेटेल

-अभियान महिनाभर चालणार आहे.

-एका महिन्याने मुंबईत विधान भवनावर विराट मोर्चा काढणार

-मोर्चात राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

-समस्या कमी करण्यासाठी सत्तांतर केले, पण समस्या आणखीनच वाढल्या

-शिवसेना पूर्ण ताकदीने या अभियानात भाग घेणार

-मी स्वतः रस्त्यावर उतरणार, ऊन असो किंवा पाऊस, पण मी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाणार