महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरे, तर उपसभापतीपदी मनसेच्या शीतल भामरे यांची अविरोध निवड झाली. सभापदीपदासाठी सेनेच्या नंदिनी जाधव यांनी माघार घेतल्याने निवडणूक अविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

महसूल उपायुक्त रावसाहेब भागडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी महाआघाडीतर्फे काँग्रेसकडून खैरे, तर उपसभापतीपदासाठी मनसेच्या भामरे यांनी अर्ज दाखल केला होता. तर विरोधी शिवसेनेकडून जाधव यांनी सभापती-उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. महिला व बालकल्याण समितीत महाआघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. मनसेचे तीन, राष्ट्रवादी दोन, काँग्रेस एक तर शिवसेना दोन व भाजप एक असे पक्षीय बलाबल आहे. महाआघाडीकडे पूर्ण बहुमत असल्याने खैरे व भामरे यांची निवड निश्चित मानली जात होती. विरोधकांना माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. निवडणूक लढवूनही अपेक्षित संख्याबळ गाठणे कठीण होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर माघारीसाठी वेळ दिली गेली. त्या वेळी सेनेच्या जाधव यांनी दोन्ही पदांसाठीची उमेदवारी मागे घेतली. रिंगणात कोणी प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सभापतीपदी खैरे, तर उपसभापतीपदी भामरे यांची निवड झाल्याचे जाहीर केले.