गर्भलिंग निदान करताना अवलंबिलेल्या नव्या कार्य पद्धतीमुळे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रचालकांचा शोध घेणे आरोग्य विभागासमोर आव्हान ठरले आहे. संबंधितांच्या नव्या तंत्रावर तोडगा काढण्याकरिता आरोग्य विभाग आता जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या सहकार्याने नवीन मार्ग धुंडाळत आहे.

सांगलीच्या म्हैसाळ येथील खासगी रुग्णालयात बनावट डॉक्टरने थाटलेला अवैध गर्भपाताचा व्यवसाय समोर आल्यानंतर राज्यात रुग्णालय तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली. मुलगाच हवा या मानसिकेतत वावरणारी कुटुंबे गर्भातच मुलीची हत्या करण्यास मागेपुढे पाहत नाही. त्यांना साथ मिळते ती, काही सोनोग्राफी केंद्रचालक व डॉक्टर मंडळींची. वास्तविक, या प्रक्रियेत गर्भलिंग निदान होऊ नये म्हणून कठोर शिक्षेची तरतूद असणारे कायदे अस्तित्वात आहेत; परंतु काही मंडळी झटपट पैसे मिळविण्याच्या उद्देशाने हे उद्योग करत असल्याचा  संशय आहे.   सुशिक्षित वर्गाचा त्यात अधिक सहभाग असतो, असे सोनोग्राफी केंद्रचालक व दलालांच्या नव्या कार्यपद्धतीचा उलगडा जिल्हा शल्यचिकित्सक एस. पी. जगदाळे यांनी केला. नियमानुसार २० आठवडय़ापर्यंत गर्भपातास परवानगी असते. त्यामुळे १२ ते २० आठवडे या काळात होणाऱ्या सोनोग्राफींवर बारकाईने नजर ठेवणे महत्त्वाचे ठरते. याच काळात गर्भलिंग निदान करीत गर्भपात वा तत्सम कृतीची शक्यता बळावते; परंतु याच काळात सापळ्यात अडकणार नाही, याची चालक दक्षता घेतात.

नियमित स्वरूपाची सोनोग्राफी असल्याचे वरकरणी दर्शविले जाते. लिंग निदानाबाबत लगेच माहिती दिली जात नाही. काही दिवसांच्या अंतराने ते मध्यस्थ दलालास माहिती पुरवितात. परिणामी, या प्रक्रियेतील मध्यस्थ आणि सोनोग्राफी केंद्रचालकांना पकडणे जिकिरीचे ठरते. अशाच काही कारणांमुळे वर्षभरात आरोग्य विभागाने रचलेले चार सापळे अयशस्वी ठरले.

या स्थितीत आरोग्य विभाग पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने मध्यस्थ आणि अशा केंद्रचालकांपर्यंत कसे पोहोचता येईल, यावर नव्याने उपाय योजत असल्याचे डॉ. जगदाळे यांनी सूचित केले.

चालकांचे नवे तंत्र

संबंधित चालक केवळ मध्यस्थ दलालांकडून आलेल्या गर्भवतींचीच या स्वरूपाची चाचणी करतात. केंद्रात थेट आलेले व अधिक मोबदला देण्याची तयारी दर्शविणाऱ्यांचे गर्भ लिंग निदान करण्यास नकार दिला जातो. आरोग्य विभागाने रचलेल्या सापळ्यावेळी हा अनुभव आल्याचे जगदाळे यांनी नमूद केले. मध्यस्थामार्फत आलेल्या गर्भवतीची सोनोग्राफी करताना दक्षता घेतली जाते. सोनोग्राफी करताना यंत्रणेच्या स्क्रीनवर सर्व काही दिसते. या वेळी एकतर मध्यस्थ उपस्थित असतो किंवा तो नसला तरी नातेवाईकांना लगेच काहीही सांगितले जात नाही. नियमित सोनोग्राफी प्रमाणे ही प्रक्रिया राबविली गेल्याचे दर्शविले जाते. सोनोग्राफी झाल्यानंतर चालक कधी तरी गर्भलिंग निदानाबाबतची माहिती मध्यस्थापर्यंत पोहोचवितात. या कार्यपद्धतीमुळे अशा उद्योगात सहभागी चालक व मध्यस्थांना पकडणे अवघड ठरल्याचे डॉ. जगदाळे यांनी नमूद केले.