‘प्रो कबड्डी’मध्ये यशस्वी झालेला महिला पंचांचा प्रयोग राज्यातील कबड्डीच्या सामन्यांतही राबविता येईल. महिलांनी त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्य कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाह आस्वाद पाटील यांनी केले. जिल्हा कबड्डी संघटना आणि क्रीडा प्रबोधिनी यांच्यावतीने येथील विभागीय संकुलात शनिवारी राज्य कबड्डी पंच शिबिरास सुरूवात झाली. शिबिराचे उद्घाटन राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता पाथरीकर, सहसचिव प्रकाश बोराडे, ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य मोहन भावसार, जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आ. जयंत जाधव आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी पाटील यांनी पंचांनी न्यायाधिशाच्या भूमिकेत राहणे गरजेचे असल्याचे नमूद केले. पंचांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. आ. जाधव यांनी पंचांनी निष्पक्षपातीपणे भूमिका बजावल्यास खेळाचा दर्जा उंचाविण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. पंचांसाठी शारीरिक व मानसिक तंदुरूस्ती महत्वाची असल्याचे ते म्हणाले. उद्घाटन सोहळ्यानंतर तज्ज्ञांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष मनोहर इंदुलकर व सचिव राऊत यांनी ‘कबड्डीतील नवनवीन बदल-नियम व पंचांची कामगिरी’ यावर मार्गदर्शन केले. राज्यभरातून पंच सहभागी झाले आहेत. शिबिराचा समारोप रविवारी दुपारी दीड वाजता होणार आहे.