संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची माहिती

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सुखोईच्या सखोल दुरुस्तीची (ओव्हरऑल) जबाबदारी पुढील २०५० पर्यंत हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेडच्या नाशिक कारखान्याला सांभाळावी लागणार आहे. शिवाय, पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचे कामही या कारखान्याकडे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कारखान्यातील कामगारांनी भीती बाळगू नये, असे आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

सुखोई बांधणीचे लक्ष्य लवकरच पूर्ण होत असल्याने पुढील काळात एचएएलच्या नाशिक विभागाकडे काम राहणार नसल्याची कर्मचाऱ्यांना धास्ती आहे. संरक्षण क्षेत्रातील खासगी उद्योगांनी सार्वजनिक उद्योगांशी सहकार्य करून लढाऊ विमाने, रणगाडे, हेलिकॉप्टर व युध्दनौका यांची देशांतर्गत बांधणी व्हावी म्हणून खास उपक्रम आखण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले.

शेतकरी कर्जमाफीच्या प्रमाणपत्र वितरणासाठी आलेल्या भामरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एचएएलच्या प्रश्नावर माहिती दिली. तंत्रज्ञान हस्तांतरण कराराच्या माध्यमातून १८० सुखोई विमानांची बांधणी एचएएलच्या नाशिक कारखान्यात केली जात आहे. पुढील दोन वर्षांत हे काम संपुष्टात येईल. या स्थितीत अद्याप नवीन काम कारखान्यास मिळालेले नाही. हवाई दलाच्या ताफ्यात सुखोई विमानांची संख्या मोठी आहे. दहा वर्षे कार्यरत राहिलेल्या विमानांची सुरक्षिततेसाठी संपूर्ण दुरुस्ती बंधनकारक ठरते. हे काम एचएएलच्या नाशिक कारखान्यात केले जाते.

नाशिक कारखान्यात पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांची बांधणी व्हावी, असा प्रयत्न आहे. शस्त्रास्त्रांच्या आयातीत भारत आघाडीवर आहे. मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत शस्त्रांस्त्रांमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी खासगी उद्योगांना बळ देण्याचे धोरण ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

विस्तारीकरणाचा प्रयत्न

विशिष्ट हवाई तास उड्डाण झाल्यानंतर विमानाचे सर्व भाग पूर्णपणे विलग केले जातात. प्रत्येक सुटय़ा भागाची तपासणी केली जाते. त्यांची झीज, यंत्रणांमधील दोष यावर संशोधन होते. प्रयोगशाळेत सखोल छाननीच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडते. त्यात सदोष सुटे भाग काढून त्यांच्या जागी पूर्णपणे नवीन भाग बसविले जातात. एका विमानाच्या ओव्हरऑलसाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो. सद्यस्थितीत एचएएल वर्षांला १२ विमानांचे ‘ओव्हरऑल’ करते. ही क्षमता वर्षांकाठी ३० विमानांपर्यंत विस्तारण्याचा प्रयत्न आहे. हे काम प्रदीर्घ काळ सुरू राहणार असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले.

भारताकडून चोख प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम राबविली आहे. यामुळे दहशतवादी गट आणि पाकिस्तान सैरभैर झाला आहे. सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या कोणत्याही आगळीकीला भारतीय लष्कर तीव्रतेने चोख प्रत्युत्तर देते, असे भामरे यांनी सूचित केले.