कुलभूषण जाधव यांना फाशी दिल्यास हत्या समजू

शत्रूराष्ट्राला समोरासमोर युध्द लढता येत नसल्याने तो छुप्या पध्दतीने कारवाया करत काश्मिरी तरुणांना चिथावणी देत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर होणाऱ्या दगडफेकीमागे ते मुख्य कारण आहे. दगडफेकीचे प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाय योजना केल्याची माहिती केंद्रीय संरक्षणराज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. कुलभूषण जाधव यांच्या बाबतची न्यायालयीन प्रक्रिया पाकिस्तानने पारदर्शक पध्दतीने पार पाडावी. त्यांच्याकडून फाशीचे पाऊल उचलले गेल्यास ती हत्या समजली जाईल अशी भारताची भावनाही पाकिस्तानला कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

येथील स्वामी नारायण स्कूलमध्ये शनिवारी राज्यस्तरीय माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गेल्या वर्षी बुरहान वाणी या दहशतवाद्याला कंठस्नान घातल्यानंतर काश्मीरमधील स्थिती चिघळली आहे. अतिरेक्यांविरोधातील कारवाईवेळी स्थानिक युवक जवानांवर दगडफेक करून मोहिमेत अडथळे आणतात. आता तर महाविद्यालयीन युवक-युवती दगडफेक करीत असल्याचे चित्र आहे. या एकंदर घडामोडींवर भामरे यांनी टिपण्णी केली. सातत्याने घडणाऱ्या दगडफेकीमागे राष्ट्रविरोधी शक्तींचे षडयंत्र आहे. काश्मिरी तरुण-तरुणींना चिथावणी देण्याचे उद्योग संबंधितांकडून होत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्राने विशेष व्यूहरचना केली असून लवकरच हे प्रकार थांबतील, असा विश्वास भामरे यांनी व्यक्त केला. पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. जाधव हे ‘रॉ’चे हेर नाहीत.

पाकिस्तानने न्यायालयीन प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याची गरज आहे. जाधव यांना कायदेशीर मदत मिळण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. या स्थितीत पाकिस्तानने अनुचित पाऊल उचलल्यास भारत ते सहन करणार नसल्याचे भामरे यांनी सूचित केले. मेळाव्यात माजी सैनिकांनी आपल्या विविध स्वरुपाच्या मागण्या मांडल्या होत्या. त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.