सभागृहात अतिशय पोटतिडकीने बळीराजाची व्यथा शेतकरी प्रतिनिधी मांडत होते. वातावरणात कमालीचे गांभीर्य होते. याचवेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आगमन झाले. त्यांच्या पाठोपाठ पदाधिकाऱ्यांचा मोठा लवाजमा सभागृहात शिरला. पहिल्या रांगेत पक्षप्रमुख आसनस्थ झाल्यावर व्यासपीठाच्या सभोवताली शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची एकच गर्दी झाली. गडबड गोंधळही सुरू झाला. यामुळे बदललेले वातावरण लक्षात घेऊन उद्योगमंत्री सुभाष देसाई थेट व्यासपीठावर पोहोचले आणि त्यांनी शिवसैनिकांना कानपिचक्या देत विषयाचे गांभिर्य लक्षात आणून दिले.

शिवसेनेतर्फे आयोजित कृषी अधिवेशनात पहिल्या सत्रात राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या शेतकरी प्रतिनिधींनी शेती व शेतकऱ्यांशी संबंधित समस्या मांडल्या. या प्रतिनिधींमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी, समृध्दीबाधीत शेतकरी कुटुंबातील युवती, वेगवेगळ्या समस्यांनी संकटात गुरफटलेले शेतकरी यांचा अंतर्भाव होता. संबंधितांवर कोसळलेले संकट ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. सभागृहात अतिशय शांतता होती. नेमक्या याचवेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आदित्य यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यांच्या समवेत सुरक्षा रक्षकांचा मोठा फौजफाटा होता. त्यांच्या पाठोपाठ बाहेरील शामियान्यात थांबलेले पदाधिकारी व शिवसैनिकांचा मोठा लोंढा मुख्य सभागृहात शिरला. सभागृह आधीच पूर्णपणे भरलेले होते. त्यात नव्याने आलेल्यां शिवसैनिकांसाठी जागा नव्हती. यामुळे बहुतांश शिवसैनिक व्यासपीठाच्या भोवती जिथे जागा मिळेल तिथे दाटीवाटीने उभे राहू लागले.

पक्षप्रमुख आसनस्थ झाल्यानंतर आसपासच्या सर्व भागात पदाधिकारी व शिवसैनिकांचा गराडा पडला. या घडामोडींमुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

ही बाब लक्षात आल्यावर सुभाष देसाई यांनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेऊन शिवसैनिकांना कानपिचक्या दिल्या. शेतकऱ्यांशी निगडीत गंभीर विषयावर अधिवेशनात चर्चा होत आहे. शेतकरी त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत आहेत. यामुळे विषयाचे गांभिर्य ठेवणे आपल्या सर्वाचे कर्तव्य असल्याची जाणीव त्यांनी करून दिली.

सभागृहात जागा कमी असल्याने व्यासपीठाजवळ उभे राहिलेल्यांनी मागील बाजुला जाऊन उभे रहावे, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. शिवसैनिकांनी शिस्त पाळावी असे त्यांनी सांगितल्यावर इतरांनी धाव घेत व्यासपीठाजवळ थांबलेल्यांना बाजुला नेले. या घडामोडींमुळे दहा मिनिटे थांबलेला कार्यक्रम नंतर पुढे सुरू झाला.