बळीराजाच्या प्रबोधनासाठी प्रयत्न

नैसर्गिक आपत्तीचा फेरा, कृषिमालास मिळणारा अत्यल्प भाव, कर्जाचा वाढणारा डोंगर.. आदी कारणांनी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येसारख्या टोकाच्या विचारांना तिलांजली द्यावी, यासाठी याच कारणांनी आपले पालक गमावून निराधार झालेल्या बालकांनी राज्यातील बळीराजाच्या जनजागृतीसाठी नववर्षांत प्रबोधन दिंडी काढण्याचा संकल्प सोडला आहे. ‘आमच्या वडिलांनी जी चूक केली, ती तुम्ही करू नका..आपल्या कच्च्याबच्च्यांना उघडय़ावर सोडू नका.. हा संदेश १२ दिवसीय प्रबोधन दिंडीत त्यांच्यामार्फत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देण्यात येणार आहे. या दिंडीचा समारोप मुंबईत मुख्यमंत्र्यांना बळीराजाला वाचविण्याचे साकडे घालून होणार आहे.

शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी शासनासोबत संवेदनशील व्यक्ती आणि संस्थांकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांवर कोसळणारे संकट शब्दातीत. या संकटाची अनुभूती घेऊन पोरके झालेल्या बालकांनी पुन्हा तसे कोणी निराधार होऊ नये म्हणून जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून मार्गक्रमण करताना आधारतीर्थ आधाराश्रम दृष्टिपथास पडतो. या ठिकाणी विदर्भ व मराठवाडय़ात शेतकरी वडिलांच्या आत्महत्येमुळे निराधार झालेली सुमारे ५० हून अधिक बालके वास्तव्यास आहेत. आधाराश्रमाच्या सहकार्याने ही बालके दिंडीमार्फत जनजागृती करणार आहेत. मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातो. नववर्षांत १२ ते २४ जानेवारी या कालावधीत बालके राज्यात प्रबोधन दिंडी काढणार आहेत.

वीज देयक माफी, शेतमालास किफायतशीर भाव, समाधानकारक पाऊस, उत्कृष्ट बियाणे, खतांची वेळेवर उपलब्धता अशी कोणतीही हमी आम्ही देऊ शकत नाही. तथापि, कच्चा-बच्च्यांना सोडून जाण्यापूर्वी आणि बायकोचे कुंकू पुसण्याआधी एकदा अनाथाश्रमाला भेट देऊन बापाची माया शोधणाऱ्या आमच्या स्थितीचे अवलोकन करा, असे आवाहन ते करणार आहेत.

शेतीवरचे कर्ज एक-दोन वर्ष फेडता आले नाही तर आभाळ कोसळणार आहे? त्यासाठी पोटच्या लेकरांना उघडय़ावर टाकून मैदान सोडून पळणे योग्य आहे काय, असा त्यांचा प्रश्न आहे. पावसाअभावी पीक जळाले अथवा अवकाळी पावसाने सर्व धुऊन नेले त्यात आपला काय दोष? काळ्या आईची सेवा कायम ठेवल्यास आज ना उद्या कर्ज फेडणे अवघड नाही. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांनी असा टोकाचा विचार मनातून काढून टाकण्याचे आवाहन निराधार बालके करणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी प्रबोधन झाल्यानंतर २४ जानेवारी रोजी दिंडीचा समारोप मुंबईत होईल. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. बळीराजाला वाचविण्याबरोबर आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांना निवेदनामार्फत केले जाणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीसाठी अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनसह विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्याने कोणत्याही अडचणीत कटू निर्णयाप्रत जाऊ नये यासाठी शासन व सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत. अशा घटनांच्या दुष्परिणामांची दाहकता जवळून अनुभवणाऱ्या अनाथ बालकांनी आता बळीराजाला साद घातली आहे.