राजदंड पळविण्याचा प्रयत्न; पालिका हद्दीतील शाळांमध्ये वंदेमातरम सक्तीचे करण्याचा ठराव मंजूर

मालमत्ता व पाणीपट्टीत वाढ करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या निर्णयाचे तीव्र पडसाद शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. स्थायी समितीने मंजूर केलेला करवाढीचा विषय पटलावर नसताना विरोधकांनी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी दाद देत नसल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात भाजपने पटलावरील सर्व विषय मंजूर करत सभेचे कामकाज गुंडाळले. मंजूर झालेल्या विषयात  महापालिका हद्दीतील मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ सक्तीचे करण्याच्या निर्णयाचाही अंतर्भाव आहे.

काही दिवसांपूर्वी स्थायी समितीने प्रशासनाने सुचविलेल्या प्रस्तावानुसार घरपट्टीत १८ टक्के तर पाणी पट्टीत दुप्पट वाढ करण्यास मान्यता दिली होती. त्या विरोधात शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादीने मैदानात उतरण्याचे जाहीर केले होते. स्थायीच्या निर्णयाचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. सभेला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी इतर विषय बाजुला ठेवून करवाढीच्या विषयावर चर्चा करण्याचा आग्रह धरला.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हाच मुद्दा लावून धरला. तथापि, सभेच्या पटलावर हा विषय नाही. जेव्हा तो विषय पटलावर येईल, तेव्हा प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असे महापौर रंजना भानसी यांनी सांगितले. परंतु, यामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी सुरू केली.

गोंधळात कामकाज

भाजप नगरसेवकांनी त्यास प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात रणकंदन झाले. काही नगरसेवक थेट महापौरांसमोर येऊन घोषणाबाजी करू लागले. करवाढ रद्द झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका विरोधकांनी घेतली. या विषयावर चर्चेची मागणी फेटाळल्याने गटनेते विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, संतोष गायकवाड या सेना नगरसेवकांनी महापौरांच्या टेबलावरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. सभागृहातील गोंधळ पाहून महापौरांनी विकास कामांशी निगडीत विषय मंजूर केले जात असल्याचे जाहीर करत सभा संपल्याचे जाहीर केले. या गोंधळात चर्चेविना अनेक विषय मंजूर झाले. स्वच्छतेचे रात्र पाळीतील काम ठेकेदारांकडे देण्याच्या विषयाचा समावेश होता. सेना नगरसेविकेने मांडलेला शहरातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ सक्तीचे करण्याचा निर्णयही मंजूर झाला.

चर्चेविना ठराव मंजूर

दरम्यान, सभागृहातील गोंधळाबाबत महापौर भानसी यांनी विरोधकांचा विकास कामांना विरोध असल्याने चर्चेविना विकास कामांशी निगडीत विषय मंजूर करावे लागल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी करवाढीचा विषय जेव्हा सभागृहात येईल, तेव्हा त्यास याच पध्दतीने कडाडून विरोध केला जाणार असल्याचे स्पष्ट केले.