शिक्षणमंत्री आणि त्यांचे सचिव दररोज विविध निर्णयाचे फतवे काढून गोंधळाची स्थिती निर्माण करतात. याची दाद मागायला गेले तर शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांना अरेरावीची भाषा ऐकावी लागते. त्यामुळे राज्यातील शिक्षकांचे भवितव्य अंधःकारमय झाले असून शिक्षण क्षेत्रातील ही अस्वस्थता आणि गोंधळ थांबवावा, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाने शुक्रवारी यासाठी नाशिकच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन केले. यावेळी त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आपल्या व्यथा मांडल्या. शासनाने १० जुलै व १७जुलै रोजी परिपत्रक काढून २ मे २०१२ पासून मान्यता देण्यात आलेल्या शिक्षकांच्या मान्यतेच्या चौकशीचे आदेश दिले होते. तसेच चौकशीअंती अनियमित असलेल्या शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी झटकली होती. त्यामुळे १२ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांनाही वेतन बंद होण्याची भीती वाटते आहे.

या संदर्भात शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शिक्षण सचिव नंदकुमार यांची भेट घेतली असता त्यांनीही शिक्षकांना न्याय देण्याऐवजी उर्मट भाषा वापरुन शिष्टमंडळाला हाकलून लावल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तर १८ जुलै रोजी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनीही आधी स्पर्धा परिक्षेवरील बहिष्कार मागे घ्यावा त्यानंतरच तुमच्याशी चर्चा करु, असे म्हणत पदाधिकार्‍यांशी चर्चा टाळली. या सर्व प्रकाराने शिक्षकवर्गात अस्वस्थता निर्माण झाली असून शिक्षण क्षेत्रात दररोज दिल्या जाणार्‍या नव्या आदेशामुळे होत असलेली गोंधळाची स्थिती थांबवावी, अशी मागणी करीत आज शिक्षणाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. माध्यमिक शिक्षक संघाचे सहसचिव संजय पवार, एस.सी.पवार, डी.जे.मराठे, जे.बी.सोनवणे, हेमंत ठाकरे,आर.बी.अमृतकर आदींसह जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते.