रास्तारोकोमुळे वाहतूक विस्कळीत

निश्चलनीकरण झाल्यापासून आजतागायत वेतनाची हवी तितकी रक्कम मिळत नसल्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी गुरुवारी गडकरी चौकातील विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी अकस्मात रास्ता रोको देखील झाल्यामुळे पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. एक ते दीड तास शिक्षकांनी तीव्र आंदोलन करत बँक खात्यातील आपल्या हक्काचे पैसे देण्याची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.

मागील काही दिवसांपासून कर्ज मिळत नसल्याने शेतकरी आणि बँक खात्यात जमा झालेले वेतन काढता येत नसल्याने शिक्षकांनी जिल्हा बँकेच्या कारभाराविरोधात आंदोलन चालविले आहे. शिक्षकांचे वेतन न देण्यामागे जिल्हा बँक राष्ट्रीयीकृत बँकांकडून पुरेशी रोकड दिली जात नसल्याची तक्रार करत आहे. परिणामी, रोकड उपलब्धततेनुसार शिक्षकांना दोन हजार अथवा त्या प्रमाणात पैसे देणे भाग पडल्याचे कारण पुढे केले जाते. काही दिवसांपूर्वी याच मुद्दय़ावरून संतप्त शिक्षकांनी जिल्हा बँकेच्या मुख्यालयास टाळे ठोकले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नसल्याने शहर व ग्रामीण भागातील शाखांमध्ये आंदोलनाचे सत्र सुरू आहे. या घडामोडीत जिल्हा बँकेवर नियंत्रण ठेवणारा सहकार विभाग नामानिराळा आहे. ही बाब लक्षात घेऊन गुरुवारी अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांनी विभागीय सहनिबंधक कार्यालयावर धडक देऊन दाद मागितली.

हे कार्यालय अतिशय वर्दळीच्या गडकरी सिग्नललगतच्या इमारतीत आहे. याच ठिकाणी जिल्हा बँक व सहकार विभागाच्या कार्यशैलीविरोधात घोषणाबाजी करत शिक्षकांनी निदर्शने केली. आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. यावेळी अचानक रास्ता रोको सुरू झाल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. पोलिसांनी मध्यस्तीचा प्रयत्न केला. परंतु, शिक्षक मागे हटण्यास तयार नव्हते. बराच वेळ हा गोंधळ सुरू राहिला.

[jwplayer NUrV6UvZ]

संघटनेच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन विभागीय सहनिबंधकांना दिले. नोटा बंदीचा निर्णय झाल्यापासून म्हणजे सप्टेंबर २०१६ पासून १८ हजार शिक्षकांना जिल्हा बँकेतून आवश्यक तितकी रक्कम मिळत नाही. शाळा सोडून शिक्षक व कर्मचाऱ्यांना दोन ते तीन तास रांगेत उभे रहावे लागते. बँक आमच्या हक्काचे पैसे दोन हजार रुपये प्रमाणे देत आहे. या संदर्भात बँक अधिकाऱ्यांना वारंवार भेटून पगाराचे पैसे देण्याची मागणी केली गेली. बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी आरटीजीएसद्वारे हवे तितके पैसे देण्याची तयारी दर्शविली. ज्या ठिकाणी आरटीजीएस सुविधा नसेल तिथे रोख स्वरूपात दिले जाईल असे लेखी आश्वासन दिले. परंतु, अद्याप पैसे मिळाले नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली. या प्रश्नात विभागीय सहनिबंधकांनी लक्ष घालून बँकेला आदेश देऊन वेतनाची संपूर्ण रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

त्यामुख्याध्यापकाच्या हाती ७० हजार रुपये

मुलीच्या शैक्षणिक शुल्कासाठी जिल्हा बँकेच्या पंचवटी शाखेत स्वत:ला कोंडून घेणाऱ्या मुख्याध्यापकाला बँकेमार्फत गुरुवारी ७० हजार रुपये देण्यात आले. महिनाभरापासून खेटा मारूनही खात्यातील हक्काचे पैसे दिले जात नसल्याची तक्रार मुख्याध्यापक प्रमोद लोखंडे यांनी केली होती. मुलीच्या शिक्षणासाठी भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढली होती. या कर्जाची रक्कम जिल्हा बँकेच्या खात्यात जमा झाली. ही रक्कम काढता येत नसल्याने त्यांनी सपत्निक बँकेच्या पंचवटी शाखेत स्वत:ला कोंडून घेतले. त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बँकेने गुरुवारी त्यांना ७० हजार रुपयांची रोकड उपलब्ध केली.

शिक्षकांची व्यथा

मागील कित्येक महिन्यांपासून पूर्ण वेतन खात्यातून काढणे अवघड बनले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पतसंस्थेतून लाखो रुपयांचे काढलेले कर्ज जिल्हा बँकेच्या खात्यांमध्ये जमा झाले आहे. ही रक्कमही काढता येत नाही. व्याज माथी पडत आहे. बँक खात्यात पैसे असूनही धनादेश परत पाठविले जातात. बँकेत पैसे असूनही आजारपण व मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी त्याचा वापर करता येत नसल्याची व्यथा शिक्षकांनी मांडली.

[jwplayer m2s7dj9l]