जिल्ह्यत उष्णतेची लाट

सलग चार दिवस पारा ४० अंशावर राहिल्याने जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून जनजीवनावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये बुधवारी पुन्हा एकदा ४०.३ अंशांची नोंद झाली. रविवार पासून नाशिकचा पारा ४० अंशावर आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरी व ग्रामीण भागात दैनंदिन कामकाजाच्या वेळेत बदल झाला आहे. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडतात तसेच ग्रामीण भागात शेतातील कामेही थंडावतात. भल्या सकाळी अथवा सायंकाळनंतर कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात टळटळीत उन्हाळ्याची दाहकता जाणवत आहे. एरवी मार्चपासून वाढणारे तापमान एप्रिलच्या मध्यावर तापमानाची ही पातळी गाठते, असा सर्वसाधारण अनुभव. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकने यंदा मात्र त्यास छेद दिला आहे. नाशिकमध्ये पारा ४० अंशांच्या पुढे गेला असताना मालेगावमध्ये सर्वाधिक ४३ अंशाची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. मागील आठवडय़ाच्या तुलनेत तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ झाल्याचे लक्षात येते. तापमानाची ही पातळी सलग चार दिवस कायम आहे. उन्हाच्या तडाख्याने बहुतांश नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडणे पसंत केले. यामुळे प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे दिसते. प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार पूर्णपणे थंडावतात. तशीच स्थिती ग्रामीण भागातही आहे. सध्या उन्हाळ कांदा काढणीचे काम सुरू आहे. उन्हामुळे शेतात काम करणारे शेतमजूर सकाळी लवकर शेतात जातात. अकरा वाजेपर्यंत काम करून दुपारी शेतातील झाडांच्या सावलीत आराम करतात. चार वाजेनंतर पुन्हा सायंकाळी सात वाजेपर्यंत काम करतात. दुपारच्या वेळेत कोणीही बाहेर फिरताना दिसून येत नाही. या काळात नागरिक टोपी किंवा उपरणे डोक्यावर घालून बाहेर पडतात.

वाढत्या तापमानाने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना वैद्यकीय तज्ज्ञांकडून केल्या जात आहेत. शासकीय रुग्णालयांत उष्माघात कक्षांची स्थापना करून आरोग्य विभागाने सज्जता राखली आहे. उन्हाळ्याची दाहकता कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून तयारी सुरू आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर नेहमीप्रमाणे कंपन्यांनी विविध साधने बाजारात आणली आहेत. महागडय़ा वातानुकूलित यंत्रणा खरेदीसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. गेल्या काही दिवसात वातानुकूलीत यंत्र, पंखे, थंडगार पाण्यासाठी माठ, खिडक्यांना पडद्याप्रमाणे बसविल्या जाणाऱ्या वाळा तत्सम साधनांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रमुख चौकांत शीतपेय, आईस्क्रिम पार्लर, रसवंती अशा दुकानांवर गर्दी वाढली आहे. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारची जाळी लावून उष्णता नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहे. घराच्या मुख्य दरवाजासमोर, अंगणात किंवा बागेत रोपांच्या वृक्षांच्या संरक्षणासाठीही अशा जाळीच्या विशिष्ट कापडाचा वापर केला जात आहे. उन्हाळ्यात धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढत असतो. शहरी भागात अद्याप टंचाई अजून जाणवत नसली तरी काही दुर्गम भागात पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाली आहे. मार्चमध्ये ही स्थिती असल्याने पुढील दोन महिन्यात काय होणार याची धास्ती व्यक्त होत आहे.

आपत्कालीन भारनियमनाचा जाच

उन्हाची तीव्रता शिगेला पोहोचली असताना अचानक वीज गायब होण्याचे प्रकार अन् ग्रामीण भागात सलग कित्येक तास भारनियमन होत असल्याने नागरिक अधिकच हैराण झाले आहेत. मनमाड शहरात मागील काही दिवसांपासून दुपारी तीन तास अघोषित भारनियमन सुरू आहे. इतरही भागात असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. ऐन उन्हाळ्यात होणाऱ्या आपत्कालीन भारनियमनामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे.