समाजमाध्यमांचाही समावेश

इलेक्ट्रॉनिक, मुद्रित व समाजमाध्यमांवर कोणत्याही स्वरूपात निवडणुकीचा प्रचार करताना प्रत्येक उमेदवाराला त्यातील मजकुराबाबत आधी प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. परवानगी न घेता या पद्धतीने प्रचार करणारी बाब निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारी ठरेल. हे प्रमाणपत्र देण्याकरिता महापालिकेत तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. या काळात अन्य उमेदवाराचा समाजमाध्यमांवरून प्रचार करणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर ही कारवाई होईल, असे निवडणूक यंत्रणेने सूचित केले. वास्तविक, निवडणूक जाहीर होण्याआधीपासून इच्छुक उमेदवारांकडून समाजमाध्यमांवर जोरदार प्रचार होत आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यात लक्षणीय वाढ झाली. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा विचार केला तरी एकूण उमेदवारांची संख्या ६०० हून अधिक होईल. शेकडोंच्या संख्येने असणाऱ्या उमेदवारांच्या समाजमाध्यमांवरील प्रचारावर निवडणूक यंत्रणा कशी लक्ष ठेवणार, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली. निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आचारसंहितेबाबत राजकीय पक्ष, उमेदवार व पदाधिकाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. आचारसंहिता लागू करण्यासाठी मुख्यालयासह सहा विभागांत प्रत्येकी एक आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील फलक हटविण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. आता कोणताही पक्ष वा उमेदवारांनी अनधिकृतपणे फलक लावल्यास त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल. कोणत्याही माध्यमावर जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी त्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवारांना प्राप्त करून घ्यावे लागणार आहे. यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. समाजमाध्यमावरील प्रचारात्मक बाबींविषयी तक्रार आल्यास प्रथम ही परवानगी घेतली होती की नाही, त्याची पडताळणी केली जाईल. ही परवानगी नसल्यास आचारसंहिता भंग झाल्याबाबत कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त विजय पगार यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनचा वापर लक्षणीय वाढला आहे. त्याच्या मदतीने समाजमाध्यमांवर कायमस्वरूपी कार्यरत असणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. पालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधीपासून इच्छुकांनी या माध्यमांद्वारे आपली छबी चमकविण्याचे प्रयत्न सुरू केले. मकरसंक्रांत वा नवीन वर्षांचे औचित्य साधून बहुतांश उमेदवार मतदारांसमोर जाहिरातबाजी करत आहेत. महापालिकेत ३१ प्रभागांतून एकूण १२२ सदस्य निवडले जाणार आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या जागांवर उमेदवार उभे केल्यास त्यांची संख्या ६०० हून अधिक होईल.

अपक्ष, स्थानिक आघाडय़ांचे उमेदवार वेगळेच. शेकडोंच्या संख्येने मैदानात उतरणाऱ्या उमेदवारांना समाजमाध्यमावरील प्रचारासाठी हे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. या संदर्भात कोणी तक्रार केल्यास पडताळणी करून कारवाई केली जाणार आहे. या व्यतिरिक्त पालिकेची यंत्रणा समाजमाध्यमांवर या पद्धतीने फिरणाऱ्या जाहिरात्मक संदेशांवर नजर ठेवणार आहे. पैसा, मद्य यांचा गैरवापर तसेच बळाचा वापर रोखण्यासाठी संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. महत्त्वाच्या घटना मिरवणुका, प्रचार फेऱ्या, सभा अशा घटनांचे चित्रीकरण केले जाणार आहे.

आचारसंहितेबाबत तक्रार

आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याबाबत उमेदवार व मतदारांना ०२५३-२५७७५४६ तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर ७७६८००२४२४ या क्रमांकावर तक्रार देता येईल.

ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. निवडणूक अर्ज भरण्यासाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी ही मुदत आहे. उमेदवार ऑनलाइन माहिती चोवीस तासांत कधीही भरू शकतात. त्यासाठी वेळेचे बंधन नाही. ऑनलाइन भरलेल्या माहितीची प्रिंट त्यांना ३ फेब्रुवारीपर्यंत दुपारी दोनपर्यंत सादर करण्याची मुदत आहे.

उमेदवारांना स्वतंत्र खाते बंधनकारक

महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला चार लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा आहे. निवडणुकीच्या खर्चासाठी प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक आहे. निवडणुकीचा खर्च त्याला या खात्यामार्फत करावा लागेल.