राज्यातील मुस्लीम धर्मगुरूंकडून मार्गदर्शन

समाजात बळावत चाललेल्या वाईट प्रथा आणि प्रवृत्ती हद्दपार करून सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी सुफी संतांची शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणावी. त्या शिवाय सुसंस्कृत समाज व एक सच्चा मुसलमान घडणे अशक्य आहे. सुफी संतांनी दाखविलेल्या सत्याच्या मार्गानुसार आणि त्यांनी दिलेल्या इस्लाम धर्माच्या शिकवणींचा ठेवा सदैव सोबत बाळगल्यास जीवनातील अनंत अडचणी दूर होतील, असे प्रतिपादन मुफक्कीरे मिल्लत हजरत सय्यद अली अशरफ जिलानी यांनी केले.

अल अशरफ फाऊंडेशनच्यावतीने पखाल रोडवरील अशरफनगर येथे आयोजित जश्ने गौसे-ए-आजम आणि महफिले २८व्या शब या धार्मिक परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

परिषदेत राज्यभरातील अन्य मुस्लीम धर्मगुरूंनी उपस्थित राहून धार्मिक व सामाजिक मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मालेगावचे मौलाना इफ्तेखार जामी अशरफी, हाफीज समदानीनी, सुफी अब्दुल लतीफ, मौलाना फहीम साहब, मौलाना एजाज साहब, हाफीज हिलाल साहब, मौलाना जुबेर अहमद आदी उपस्थित होते.

मौलाना मुफ्ती साहिल परवेझ अशरफ यांनी निष्पाप व निरपराध्यांना ठार मारणे माणुसकीची हत्या करण्यासारखे असल्याचे सांगितले. इस्लाममध्ये असे कृत्य करणे निषिद्ध असून प्रेषित महंमद पैगंबरांनी त्यापासून दूर राहण्यास बजावले असल्याचे त्यांनी नमूद केले. जगभरातील मुस्लिमांवर त्यांच्या तत्त्वांची जोपासना करण्याची जबाबदारी आहे. तसेच धर्मग्रंथामधील विचार समजून न घेतल्याने अनेकदा गैरसमज होतात आणि त्यातून संघर्षांचे प्रकारही उद्भवतात. पवित्र कुराणातील तत्त्वे ही चांगले जीवन जगण्यासाठी दिशादर्शक असून त्यातले सत्य जाणले पाहिजे, याकडे मालेगावचे मौलाना इफ्तेखार जामी अशरफी यांनी लक्ष वेधले. जिलानी यांनी भारतासह जगभरात शांतता व समृद्धी नांदो, मानवी मूल्यांची जोपासना करण्याचे आत्मिक बळ सर्वामध्ये निर्माण होवो, अशी सामूहिक प्रार्थना करत परिषदेची सांगता केली आणि नव्या सुधारणेचा पाया रचल्याचे यातून स्पष्ट केले.