दीपावलीच्या सुटींमध्ये बहुतांश चाकरमाने आपआपल्या गावी तसेच काही जण पर्यटनासाठी जात असल्याची संधी साधून चोरटे आपली दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज होतात. दरवर्षी दिवाळीच्या सुटींमध्ये वाढणाऱ्या चोऱ्यांमुळे हेच दिसून येत असून या पाश्र्वभूमीवर सुटय़ांमधील चोऱ्या रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे. नागरिकांनीही गावी जाताना घराच्या सुरक्षिततेसंदर्भात काही उपाययोजना करणे गरजेचे ठरले आहे.

शहरात पाळत ठेवून एखाद्याची लूट करणे, आपल्या वाहनास धक्का लागल्याची बतावणी करत एखाद्यास भररस्त्यात मारहाण करून त्याच्याकडील ऐवज लुटून नेणे, दुचाकीवरून येत सोनसाखळी ओढून नेत फरार होणे, बंद घर हेरून चोरी करणे असे प्रकार सर्रासपणे होत आहेत. अलीकडे नाशिकची दंगल, वेगवेगळ्या समाजांकडून निघणारे मोर्चे यासाठी बंदोबस्तातच पोलिसांचा अधिक वेळ खर्च झाल्याने चोरटय़ांचे फावले. त्यामुळेच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली. त्यातच लूट आणि चोरीच्या घटना अधिक घडल्या. दिवाळीच्या सुटींच्या पाश्र्वभूमीवर या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी नागरिकांना बाहेरगावी जाताना खबरदारी घेण्यास बजावले आहे. शहरातील अंबड, सातपूर, सिडको या कामगारबहुल वसाहतींमध्ये चाकरमान्यांची संख्या अधिक असल्याने दिवाळीच्या सुटीत या भागातील बहुतांश घरे बंद असतात. नेमकी हीच संधी चोरटय़ांकडून साधली जाते. कुलूपबंद असलेली घरे हेरून रात्री अशा घरांमध्ये चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. चोरी रोखणे हे पोलिसांचे कर्तव्य असले तरी नागरिकांकडूनही त्यांना अपेक्षित सहकार्य मिळणे आवश्यक असल्याने पोलिसांकडून यासंदर्भात काही सूचना करण्यात आल्या आहेत.

बाहेरगावी जाताना नागरिकांनी आपल्या शेजारच्यांना तसेच पोलिसांना माहिती देणे योग्य ठरते. विशेषत: सोसायटी, कॉलन्यांमध्ये कोणी अनोळखी व्यक्ती संशयास्पद पध्दतीने वावरत असल्यास त्यासंदर्भात त्याची चौकशी करणे गरजेचे आहे. कुलूपबंद घरातील कुटुंब बाहेरगावी गेले आहे की गावातच कुठे गेले आहेत यासंदर्भात शेजारील व्यक्तींना माहिती नसल्यास आणि काही अनुचित प्रकार घडल्यास निश्चित माहिती मिळणे कठीण होत असल्याचा पोलिसांचा अनुभव आहे. आपल्या शेजारील कुटुंबाना बाहेरगावी जाताना कुठे जात आहोत आणि कधी परत येणार आहोत, यासंदर्भात माहिती दिल्यास त्यांच्या अपरोक्ष कोणी संबंधित कुटुंबाची चौकशी केल्यास त्याविषयी शेजारील मंडळी संबंधित घर मालकास सचेत करू शकतात. त्यामुळे संभाव्य घरफोडीस आळा घालणे शक्य होऊ शकते. वसाहतींमध्ये फेरीवाले, भंगारवाले हे कायम फिरत असतात. त्यापैकी बरेच जण त्या त्या भागातील नागरिकांच्या चांगलेच परिचयाचे झालेले असतात. अशा नेहमीच्या फेरीवाल्यांव्यतिरिक्त इतर कोणी अनोळखी फेरीवाला किंवा भंगारवाला सुटय़ांमध्ये आपल्या गल्लीत, वसाहतीत आल्याचे आढळल्यास नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. शहरातील काही नववसाहतींमध्ये सोसायटीत तसेच कॉलन्यांमध्ये आपल्या भागातील चोऱ्या रोखण्यासाठी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. काही चोऱ्या झाल्या असल्या तरी सीसी टीव्ही कॅमेऱ्याव्दारे करण्यात आलेल्या चित्रणामुळे त्यांचा माग काढणे पोलिसांनाही सोपे होते. अशा प्रकारचे उपाय नागरिकांनी केल्यास ते बिनधास्तपणे बाहेरगावी जाऊ शकतात