‘कैलास राणा शिवचंद्र मोळी.’, बम बम भोले.., ओम नम: शिवाय.. या अखंड शिवनाम साधनेचा गजर शहरातील शिव मंदिरात सुरू राहिला. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी विशेष महत्त्व असल्याने भाविकांचे जथेच्या जथे त्र्यंबकनगरीसह ठिकठिकाणच्या शिव मंदिरात दर्शनासाठी सज्ज असल्याचे पाहावयास मिळाले. लाखो भाविकांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करीत त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. शहरातील कपालेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. या निमित्त धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी नाशिकहून हजारोंच्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वरसाठी रवाना झाले. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने ४०० हून अधिक बसेसचे नियोजन केले. वाहतुकीचे नियोजन कोलमडू नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खासगी वाहनांना त्र्यंबक परिसरात प्रवेश बंद केला गेला. त्र्यंबकेश्वर बाहेर जव्हार फाटय़ावर ही वाहने लावण्याची सूचना केली गेली होती. यामुळे भाविकांना बरीच पायपीट करावी लागली. त्र्यंबक राजाच्या दर्शनाआधी हजारो भाविक ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करतात. मध्यरात्रीपासून भाविकांचे जथे प्रदक्षिणेसाठी रवाना झाले. या प्रदक्षिणेवर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे भातशेतीसह अन्य शेतीमालाचे नुकसान होते. मार्गात भाविक कचरा करतात, पिके तुडवली जातात. यामुळे नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली. दुसरीकडे रिमझिम सरी झेलत शिवभक्तांनी आपली प्रदक्षिणा पूर्ण करीत चार ते पाच तास रांगेत उभे राहून त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. फेरी मार्गात भाविकांसाठी फराळासह अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. दर्शनापूर्वी अनेकांनी कुशावर्त तीर्थात स्नानाचा आनंद घेतला.
पावसाचा त्रास होऊ नये यासाठी त्र्यंबक देवस्थानने तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक आवरण टाकून भाविकांची व्यवस्था केली. तसेच मंदिर परिसरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य विभागाने चार पथके भाविकांची शुश्रूषा करण्यासाठी कार्यरत होती. आपत्कालीन सेवेसाठी रुग्णवाहिकेची सज्जता ठेवली गेली. पोलिसांनी नाकाबंदी करीत कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळी तीन वाजल्यानंतर त्र्यंबक देवस्थान परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. कुशावर्तावर मुखवटय़ाच्या पूजनानंतर पालखी पुन्हा देवस्थान आवारात आली.
शहरातील शिव मंदिरांमध्येही पहाटेपासून भाविकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. शिव लिंगावर मंत्रोपचारात अभिषेक सुरू झाला. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कपालेश्वर मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालण्यास बंदी घालण्यात आली. पंचवटीकडून गोदाकाठावर येणारे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सायंकाळी मंदिरातून पालखी काढली गेली. सोमेश्वर येथील शिव मंदिरात महाआरती करण्यात आली. या शिवाय मनकामेश्वर, नीलकंठेश्वरसह अनेक मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मंदिर परिसरास बेल, फुले, प्रसाद यांची दुकाने लागल्यामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

 

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Loksatta sanvidhanbhan Constitution Struggle for equality
संविधानभान: समतेसाठी संघर्षयात्रा
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…