औषध विक्रीची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळे कॉलनीत अस्ताव्यस्त पद्धतीने उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे हा परिसर वाहतूक कोंडीच्या कचाटय़ात सापडला आहे. या वाहनांमुळे आधीच अरुंद असणाऱ्या मार्गावरून जाणे  अवघड ठरते. या स्थितीत आपत्कालीन काळात बाहेर पडणे अवघड ठरू शकते. या स्थितीकडे वाहतूक पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे स्थिती अधिकच बिकट झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

सीबीएस आणि महात्मा गांधी रोडला लागून गोळे कॉलनी परिसर आहे. मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस दक्षता घेत असले तरी औषधांची मोठी बाजारपेठ असणाऱ्या गोळे कॉलनीकडे नेहमीच कानाडोळा केला जातो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याच परिसरात मंगल कार्यालय आहे. त्या ठिकाणी नियमित सोहळ्यांबरोबर महिन्यातून काही विशिष्ट दिवशी वैद्यकीय प्रतिनिधींची बैठक होत असते. बुधवारी अशीच बैठक या मंगल कार्यालयात पार पडली. त्यात सहभागी झालेल्या वैद्यकीय प्रतिनिधींनी सभोवतालच्या रस्त्यांवर आपल्या दुचाकी आडव्या-तिडव्या उभ्या केल्याने स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांची कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले. एरवीही या ठिकाणी अशीच परिस्थिती असते. औषध विक्रीच्या बाजारपेठेमुळे वैद्यकीय प्रतिनिधी, व्यावसायिक आदींची दिवस-रात्र गर्दी असते. याच परिसरातील काही व्यापारी संकुलांत शिकवणी चालते. तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहने वेगळीच. ही एकंदर स्थिती आणि वाहने उभी करताना विचार होत नसल्याने गोळे कॉलनी वाहतूक कोंडीच्या कचाटय़ात सापडल्याची तक्रार स्थानिकांनी केली. काही वर्षांपूर्वी या कोंडीतून रुग्णवाहिकेला मार्ग काढणे अवघड ठरले होते. स्थानिकांना आपत्कालीन काळात बाहेर पडावयाचे असल्यास ते कसे पडणार, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करतात. परिसरात दररोज उभ्या राहणाऱ्या वैद्यकीय प्रतिनिधींच्या वाहनांची संख्या मोठी आहे. मेहेर सिग्नलवरून गंगापूररोडला जाण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनधारक याच मार्गाचा अवलंब करतात. परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होत असली तरी त्यावर तोडगा काढण्याचा विचार केला जात नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

((   गोळे कॉलनीत दररोज बेशिस्तपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते.  )))