सिग्नल तोडल्यामुळे वाहनधारकास रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाला दोन तरुणांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी टिळकवाडी सिग्नलवर घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत दोघा संशयितांना चांगलाच चोप देत अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिशय वर्दळीच्या राजीव गांधी भवनसमोर हा प्रकार घडला. दुचाकीवर दोन तरुण भरधाव निघाले होते. सिग्नल सुटला नसताना संबंधितांनी दुचाकी पुढे नेली. हा प्रकार लक्षात आल्यावर वाहतूक पोलीस कर्मचारी नामदेव सोनवणे यांनी धाव घेत संबंधितांना रोखले. वाहन थांबविल्याचा राग येऊन या युवकांनी सोनवणे यांना थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. सिग्नलवर हा प्रकार घडल्याने वाहतूक थांबली. बघ्यांची गर्दी झाली. दरम्यानच्या काळात या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. सरकारवाडा पोलिसांनी तातडीने धाव घेतली. संशयित लईक अफजल कुरेशी (१९, वडाळा नाका, कुरेशीनगर, द्वारका) आणि आमीररजा शेख सईद (१९, भोई गल्ली, भद्रकाली) गोंधळ घालत होते. पोलीस पथकाने संशयितांना चोप देऊन ताब्यात घेतले. त्यांची मोटारसायकलही जप्त करण्यात आली. या प्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम पोलिसांमार्फत सुरू असले तरी काही वाहनधारक वाहतूक पोलिसांनाही जुमानत नाहीत.

यापूर्वी रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिसांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे, अरेरावीची भाषा करणे, प्रसंगी धक्काबुक्कीचे प्रकार घडत असतात. असे कृत्य करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई होत नसल्याने बेशिस्त वाहनधारकांचे फावते असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. टिळकवाडी सिग्नलवरील घटनेत पोलिसांनी तातडीने कारवाई केल्यामुळे वाहतूक पोलिसांना न जुमानणाऱ्यांना काहीअंशी चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.