शहरातील कॉलेज रोडवर वाघाचे बनावट कातडे २५ लाख रुपयांना विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयित युवकाला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून बनावट कातडी जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार आहेर (१९, कमोदनगर) असे या संशयिताचे नाव आहे. वाघाची कातडी विकण्यास संशयित येणार असल्याची माहिती सरकारवाडा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाय. डी. उबाळे यांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक बिग बझार परिसरात चौकशीसाठी गेले. परिसरात एक युवक संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन पथकाने झडती घेतली असता पाठीवरील पिशवीत चट्टे-पट्टे असलेल्या केसाळ वस्तू, तसेच वाघाच्या तोंडासारख्या दिसणाऱ्या भागापासून शेपटीच्या भागापर्यंत दोन फूट नऊ इंच कातडी अशी सामग्री मिळाली.  पाहणी केली असता कातडे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. ओंकार हा हे बनावट कातडे २५ लाख रुपयांना विकण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडील आक्षेपार्ह सामानही जप्त करण्यात आले.