शहरातील पंचवटी आणि गंगापूर रोड परिसरातून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या दोन मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुलींचे कुटुंबीय आणि मैत्रिणींनी शोध घेऊनही त्या मिळून आल्या नाहीत. या प्रकरणी पंचवटी व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली घटना पंचवटीतील निमाणी बसस्थानक परिसरात घडली. सिडकोतील कामटवाटा येथे वास्तव्यास असणारी १६ वर्षीय युवती आडगावच्या भुजबळ नॉलेज सिटी महाविद्यालयात शिक्षण घेते. महाविद्यालयातून येत असताना संशयिताने फूस लावून तिला पळवून नेले. या प्रकरणी कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी घटना सावरकरनगर परिसरात घडली. या ठिकाणी मुलींचे वसतिगृह आहे. सतरा वर्षीय युवती वसतिगृहातून बाहेर पडल्यानंतर  परत आलीच नाही. मैत्रिणींनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिचा थांगपत्ता लागला नाही. अखेरीस वसतिगृहाच्या वतीने गंगापूर पोलिसात तक्रार देण्यात आली.