तालुक्यात पाणीटंचाईचे संकट तीव्र झाल्यामुळे अनेकांनी पर्यायी मार्ग म्हणून विहीर किंवा कूपनलिका खोदण्याचे काम हाती घेतले आहे. बुधवारी सकाळी नायगव्हाण येथे विहीर खोदण्यासाठी लावलेल्या जिलेटिनचा अचानक स्फोट होऊन दोन कामगार जागीच ठार झाले.
वाढत्या उन्हासोबत जिल्ह्य़ातील पाणी प्रश्नही गंभीर झाला आहे. पाणी मिळविण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळे मार्ग अनुसरले जात आहेत. येवला हा तसा दुष्काळी तालुका. अनेक भागांत पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे. या पाश्र्वभूमीवर, नायगव्हाणच्या शिंदे वस्तीतील साहेबराव शिंदे यांनी शेतात विहीर खोदण्याचे काम हाती घेतले. राजस्थान येथील कामगारांकडे हे काम सोपविण्यात आले. पाचू नंदाजी गुजर आणि महादु भिल्ल हे सकाळी साडेसहा वाजताच शेतात हजर झाले. विहिरीचे मोजमाप करत कामाला सुरुवात करण्यात आली.
या वेळी खोदकामासाठी त्यांनी जिलेटीन तंत्राचा वापर करत यंत्र आणि वायरची जुळवाजुळव सुरू केली. या वेळी भ्रमणध्वनीवर बोलत असताना अचानक वायर चुकीच्या ठिकाणी जोडली गेली अथवा भ्रमणध्वनी लहरींमुळे ज्वलनशील पदार्थाने पेट घेतल्याचा अंदाज आहे. यामुळे जिलेटीनचा स्फोट झाला आणि त्यात दोन्ही कामगारांचा जागीच मृत्यू
झाला. या घटनेची माहिती समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित कामगारांना येवला रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.