जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दिंडोरी तालुक्यातील तळ्याचा पाडा शिवारातील पोल्ट्री फार्मवरील संशयित कामगार रवींद्र देशमुख (४५, रा. खांडवा) या कामगाराने तेथेच काम करणाऱ्या महिला कामगाराच्या चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. पोल्ट्री फार्म जवळील पडीत खोलीत तिच्यावर अत्याचार करत तो बाहेर पडला असता तेथील सुरक्षा रक्षकाच्या हा प्रकार लक्षात आला. मुलीचे नातेवाईक व कामगारांना त्याने माहिती देताच त्यांनी आरोपीला चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिले. देशमुख याला सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील माळे दुमाला येथे सातवर्षीय चिमुकली आत्याचाराची बळी ठरली. शेजारीच राहत असणाऱ्या चुलत आजोबांकडे ती सोमवारी खेळण्यासाठी गेली होती. यावेळी संशयित विलास महाले याने चॉकलेट देण्याचे आमिष देत तिला घरातील वरच्या मजल्यावर घेऊन गेला. तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी त्याने वडील अण्णासाहेब महाले (वय ५०), आई शैलाबाई महाले (वय ५०), भाऊ प्रवीण महाले (वय २७) यांची मदत घेतली. चौघांनी मिळून तिला त्याच खोलीत इलेक्ट्रीक वायरच्या मदतीने गळा आवळून ठार मारले. याच वेळी मुलीची आई त्या बालिकेला शोधत महाले यांच्या घरी आली. मात्र घाबरलेल्या महाले कुटूंबीयांनी ती आलीच नसल्याचा पवित्रा घेत बाहेर कुठे खेळत असेल, पाहा असे सांगितले. या संधीचा फायदा घेत घरात एक कोपरा खणत त्या बालिकेचा मृतदेह त्यात पुरण्यात आला. तसेच त्यावर शेतीशी संबंधित अवजारे टाकत घराला कुलूप लावून कुटूंबियांनी तेथुन पळ काढला.

दरम्यान, त्या बालिकेला शेवटी महाले यांच्याकडे पाहिले हे सर्वांनी सांगितल्यानंतर नातेवाईकांनी महाले यांच्या घराकडे धाव घेतली असता घराला लागलेले कुलूप पाहून त्यांचा संशय अधिक बळावला. आपल्या मुलीला मृतावस्थेत पाहून तिच्या पालकांना अश्रू अनावर झाले. याप्रकरणी तिच्या पालकांनी वणी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अनंत तारगे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वणी ग्रामीण रूग्णालयात मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान, वणी पोलीसांनी नाशिकच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाला या घटनेची माहिती दिली. विभागाने संशयित विलास महाले याच्या मोबाईलचे लोकेशन घेत त्याला बोरगांव येथुन ताब्यात घेतले. या मयत बालिकेच्या नातेवाईकांनी तसेच ग्रामस्थांनी वणी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत आपला रोष व्यक्त केला. या संशयिताला ताब्यात द्या अशी मागणी लावून धरत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास पोलिसांना नकार दिला. दरम्यान पोलिस कर्मचारी देखील नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी माळेफाटा येथे आपला निषेध व्यक्त केला. या घटनेमुळे संपूर्ण गावात वातावरण चिघळले असून गावात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी सोमवारी सायंकाळी उशीराने सर्व संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले.