उघडय़ावरील वीज तारांना स्पर्श होऊन नाहक जीवितहानी होण्याच्या घटना शहरासह राज्यात ठिकठिकाणी होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील सिडको येथे गणेश चौक ते स्टेट बँक परिसरात धोकादायक विद्युत तारा व वीज वाहिनी भूमिगत करण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. उघडय़ा तारांना स्पर्श होण्याचे किंवा पावसाळ्यात शॉर्ट सर्किट होऊन विद्युत प्रवाह ओलसर भागात उतरण्याचे प्रकार अधिक प्रमाणावर घडतात. त्यामुळे भविष्यातील धोका रोखण्यासाठी या कामास सुरूवात करण्यात आली.

आ. सीमा हिरे यांच्या हस्ते या कामाची सुरूवात करण्यात आली. अलीकडे राज्यात उच्च दाबाच्या तारेचा स्पर्श होऊन लहान मुलांचा मृत्यू होण्याचे तीन ते चार प्रकार घडले. त्यामुळे महापालिकेचा विद्युत विभाग तसेच महावितरणच्या कारभाराविरोधात सर्वत्र ओरड सुरू झाली. सिडकोमध्येही अलीकडेच गणेश चौकाजवळ हनुमान चौक येथे आपल्या मुलाला विद्युत तारांचा धक्का लागल्याचे पाहून मुलाला वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वडिलांना विजेचा धक्का लागल्याने प्राण गमवावे लागले. मुलगादेखील जखमी झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये उघडय़ा विद्युत तारांविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटली. उघडय़ावरील वीज तारा त्वरीत भूमिगत करण्याची मागणी होऊ लागली. इतर कोणत्याही विकास कामांपेक्षा हे काम अधिक महत्वाचे असल्याने ते त्वरीत करण्यात यावे, यासाठी नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवरही दबाव वाढू लागला. सिडकोमध्ये एकमेकांना खेटून असलेले घरे, काही घरमालकांनी केलेले वाढीव बांधकाम यामुळे काही घरांच्या अगदी शेजारून वीज वाहिनी गेली आहे. काही घरांच्या गच्चीवरूनही वीज वाहिनी गेली आहे. पावसाळ्यात अशा वीज वाहिन्यांमुळे निर्माण होणारा धोका जीवितहानीसाठी कारणीभूत ठरू शकतो. गणेश चौकातील घटनेमुळे ते पुन्हा एकदा पुढे आले आहे. आ. सीमा हिरे यांनीही नेमका हाच मुद्दा नागरिकांसमोर मांडला. वीज तारांना स्पर्श होण्याच्या अनेक घटना मतदारसंघात झाल्याने मतदारसंघातील वीजवाहिनी भूमिगत करण्याचे काम हे इतर कामांपेक्षाही महत्वाचे झाले असल्याचे त्यांनी मान्य केले. मतदार संघातील ज्या ज्या ठिकाणी अशा धोकादायक वीज वाहिनी आहेत त्या सर्वच भूमीगत करण्यासाठी निधी उपलब्ध होण्याकरिता मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे.

नागरिकांनी देखील अशा धोकादायक तारांपासून आपली काळजी घ्यावी, असा सल्ला आमदारांनी वीज तारा भूमिगत टाकण्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी दिला. यावेळी नगरसेविका छाया देवांग, भाग्यश्री ढोमसे, वैशाली दराडे, जगन पाटील आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. गणेश पवार यांनी सूत्रसंचालन केले.