शहर परिसरात पोलीस आयुक्तालयातर्फे दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’ उपक्रम सुरू आहे. नाशिककरांसह वाहनचालकांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमात सावाना, किरकोळ धान्य व्यापारी संघटना आणि टेम्पो मालक-चालक सेना अशा संस्थाही सहभागी होऊ लागल्याने जनजागृतीला हातभार लाभत आहे.

म्हसरूळ परिसरात प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहर पोलीस आयुक्तालय यांच्यातर्फे आरटीओ कॉर्नर चौकात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या चालकांचे गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी नागरिक तसेच वाहनचालकांशी संवाद साधला. नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी उपायुक्त विजय पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात झाली. चौकात फौजफाटा पाहत धास्तावलेल्या वाहनधारकांना पोलिसांनी गांधीगिरी पद्धतीने समज दिली. आयुक्तांनी वाहनचालकांच्या हाती गुलाब पुष्प देत वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे कसे हे पटवून दिले, तर हुल्लडबाजी करणाऱ्यांना खास शैलीत समजही दिली. यावेळी परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला व युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दरम्यान या उपकमात सार्वजनिक वाचनालय नाशिकने महात्मा गांधी रस्त्यावरील सिग्नलवर ‘नो हॉर्न डे’ बाबत जनजागृती केली. यावेळी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. वाहनचालकांशी संवाद साधत प्रबोधन करण्यात आले. पोलीस आयुक्त सिंगल यांच्या हस्ते वाहनचालकांना गुलाबपुष्प देण्यात आले. वाहतुकीचे नियम पाळा, जीविताच्या रक्षणासाठी वाहन चालविताना हेल्मेट वापरा, असे वाहनचालकांना समजविण्यात आले. सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांनी पर्यावरण रक्षण आणि वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्याकरिता नो हॉर्न डे उपक्रम सोमवारीच नव्हे तर, प्रत्येक क्षणी वाहनचालकांनी पाळल्यास या समस्येवर योग्य मार्ग निघू शकेल, असा विश्वास व्यक्त केला. वाचनालयातर्फे पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमात नाशिक किरकोळ धान्य व्यापारी संघटनेचे विजय कुळकर्णी व त्यांचे सहकारी, महात्मा गांधी रोड टेम्पो चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, वसंत खैरनार, देवदत्त जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.