तरूणाईचे स्पंदन बनलेल्या समाज माध्यमांच्या वापराचे दुष्परिणाम, अंधश्रध्दाचा पगडा, महिलांचे वेगवेगळ्या पातळीवर नात्यांच्या गुंत्यात होणारे लैंगिक शोषण, शासकीय अभियानाची सद्यस्थिती, यांसह नव्या-जुन्या विषयांबरोबर अनेक सामाजिक प्रश्नांवर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी प्रकाशझोत टाकण्यात आला. ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीत एकूण १६ एकांकिका सादर झाल्या.
येथील महाकवी कालिदास कला मंदिराच्या नाटय़ परिषदेच्या सभागृहात प्राथमिक फेरी उत्साहात पार पडली. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत आयरिस प्रॉडक्शन टॅलण्ट पार्टनर तर स्टडी सर्कल नॉलेज पार्टनर आहेत. स्पर्धेच्या आयोजनात अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले आहे. प्राथमिक फेरीसाठी रविवारी आठ एकांकिका सादर झाल्यानंतर सोमवारी तितक्याच वैविध्यपूर्ण एकांकिका उत्स्फुर्तपणे सादर झाल्या. त्यात ऐनवेळी संवाद विसरल्यावर सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी होणारी धडपड, वेळेत विषय सादरीकरणासाठी चाललेली धावपळ, स्पर्धकांची विषय मांडण्याची हातोटी, इतर स्पर्धकांविषयी असणारे कुतहूल..असे सारे काही पाहावयास मिळाले.

भिकुसा यमासा क्षत्रिय महाविद्यालयाच्या ‘दोघी’ या एकांकिकेत वसतीगृहात एकाच खोलीत राहणारी एक सतत अभ्यासात दंग तर दुसरी एकाच्या प्रेमात आकंठ बुडालेली. आपण कसे योग्य आहोत हे पटवून देण्याचा दोघांचा प्रयत्न. एकीची प्रेमाच्या पहिल्याच पायरीवरून माघार तर दुसरी वासनांध वडील व मित्रांच्या फसव्या व्यवहारात अडकलेली. दोघीची होणारी घुसमट, भावनिक घालमेल एकांकिकेच्या माध्यमातून व्यक्त झाली. के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या ‘व्हॉट्स अॅप’ एकांकिकेतून समाज माध्यमांची तरूणाईमध्ये असणारी आवड, संवादाचे असलेले हक्काचे साधन, त्यातून निर्माण होणारे रुसवे-फुगवे, सामाजिक तेढ, तिरस्कार, त्याचे उमटणारे पडसाद, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सिन्नरचे शेठ ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालयाने ‘वादळवेल’मध्ये मुलगाच हवा याचा अट्टाहास तसेच मुलगी घरातील कर्त्यां पुरूषाची जबाबदारी कशी निभावू शकते यावर भाष्य करण्यात आले. मालेगावच्या म. स. गा. महाविद्यालयाने ‘एक अभियान’च्या माध्यमातून स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव यांची सद्यस्थिती, त्यातील भ्रष्टाचार, नागरिकांची मानसिकता याकडे लक्ष वेधले.
लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या ‘जंगल’ एकांकिकेत गिर्यारोहणासाठी निघालेला सहा जणांचा चमू जंगलाच्या चक्रव्यूहात अडकतो, तेथून सुटण्याची प्रत्येकाची धडपड, अगतिकता यावर भाष्य करण्यात आले आहे. नाशिकरोडच्या आरंभ महाविद्यालयाच्या ‘कोलाज्’मधून महिलांवरील अत्याचार, त्यांचे नाकारलेले मूलभूत हक्क, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेली गदा, त्यातून आलेला संघर्ष आदींवर मोजक्या संवादातून सद्यस्थितीवर ताशेरे ओढण्यात आले.
हं. प्रा. ठा. कला आणि रा. य. क्ष. विज्ञान महाविद्यालयाच्या ‘जेनेक्स’ एकांकिकेतून आजची तरूणाई आणि जुनी पिढी यांच्यातील वैचारिक दरी अधोरेखीत करत आपल्या चुका स्विकारत पालक तरूणाईची भाषा आत्मसात करत त्यांच्यातील एक होत जीवनाचे तत्वज्ञान साध्या सरळ भाषेत सांगणारा अवलीया समोर आणण्यात आला आहे. तरूणाईचे प्रश्न, त्यांची भूमिका, कळतं पण वळत नाही, अशा द्वंदात सापडलेला युवावर्ग यांवर एकांकिकेतून लक्ष वेधण्यात आले. क. का. वाघ ललित कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्यावतीने ‘त्रिकाल’ एकांकिकेत भूत, भविष्य आणि वर्तमान हे तीन काळ आणि एखादा निर्णय, त्यांचे विविध काळात उमटणारे पडसाद, काळानुरूप बदलणारी परिस्थिती यावर अनोख्या पध्दतीने भाष्य करण्यात आले
सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता विविध संघांनी कला मंदिराच्या आवारात जमण्यास सुरूवात केली. ऐनवेळी गडबड नको म्हणून स्पर्धकांनी सामानाच्या जुळवाजुळवीपासून संवाद पाठ करण्यासाठीपर्यंत धडपड सुरू होती. त्याचवेळी आपले स्पर्धक मित्र काय सादर करतात, याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. परीक्षक म्हणून धनंजय खराडे, अंशू सिंग यांनी काम पाहिले. यावेळी आयरीसच्यावतीने दीपक करंजीकर, विद्या करंजीकर उपस्थित होते.