सिडकोलगतच्या जयहिंद कॉलनीत पहाटेच्या सुमारास रिक्षा व दुचाकी जाळण्याचा प्रयत्न झाल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबड लिंक रस्त्यावरील अमिकुंज सोसायटीत हा प्रकार घडला. वाहनतळात उभी असणारी रिक्षा संशयितांनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविली. लगतच्या दुचाकीला आग लावण्यात आली. अचानक धूर आणि आगीचे लोट दिसू लागल्याने एकच गोंधळ उडाला. स्थानिकांसह आसपासच्या नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. दरम्यानच्या काळात अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सिडकोत याआधी वाहन जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. मागील काही महिन्यांपासून शहरात गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. खून, लूटमार, अपहरण, चोरी आदी घटना अव्याहतपणे सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी एका टोळक्याने थेट पोलीस चौकीत एकावर प्राणघातक हल्ला चढविला होता.