सातपूर कॉलनीतील वाहन तोडफोडीची घटना ताजी असतानाच मंगळवारी पहाटे श्रमिकनगर परिसरात पुन्हा चार ते पाच वाहनांची तोडफोड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, श्रमिकनगर व परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढत असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे.

महिनाभरापूर्वी सातपूर कॉलनीत वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी मुख्य रस्त्यावर उभ्या असणाऱ्या अनेक वाहनांची तोडफोड केली.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास यंत्रणेने संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नसल्याची स्थानिकांची भावना आहे. त्यातच सातपूर कॉलनीलगतच्या श्रमिकनगर भागात पुन्हा तसाच प्रकार घडल्याने नागरिक अस्वस्थ झाले. सातपूर औद्योगिक वसाहतीच्या पाठीमागील बाजूस असणारा हा कामगार वसाहतीचा परिसर. रात्री दोन ते पहाटे चार या वेळेत ही घटना घडल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. लोगान, इंडिका, छोटा हत्ती, महिंद्रा पिकअप या वाहनांचे त्यात नुकसान झाले. सुरभि रो हाऊस येथे वास्तव्यास असणाऱ्या अरुण मोरे यांनी त्याबद्दल माहिती दिली. त्यांच्या लोगान वाहनाची काच फोडण्यात आली. रात्री साडेबारा वाजेपर्यंत आपण जागे होतो. त्यामुळे मध्यरात्री हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. सकाळी तो लक्षात आला. आसपासच्या अन्य वाहनांची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आल्याचे मोरे यांनी सांगितले. श्रमिकनगरमध्ये टवाळखोरांचा उपद्रव आहे. पोलिसांची गस्त असली तरी तिचे प्रमाण वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली.

या घटनेची माहिती समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. चार वाहनांची तोडफोड झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर व वाहन तोडफोडीच्या घटनेबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले जाणार असल्याचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी सांगितले. गुन्हेगारी रोखण्यासाठी वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गुन्हेगार कोणीही असो, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.

पोलीस गस्त वाढविणार

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गाडय़ांच्या तोडफोडीचे प्रकार घडत आहेत. ज्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ नाही, तिथे हे प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी इमारतीत व व्यापारी संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच पोलिसांची गस्त वाढविली जात आहे.

– रवींद्र सिंघल (पोलीस आयुक्त)