नाशिक महापालिकेच्या विविध उद्यानामध्ये दररोज साचणाऱ्या हरित कचऱ्याचे संकलन करून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबवण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. शहरातील ३१ उद्यानांमध्ये खतनिर्मिती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

महापालिकेच्या उद्यानात दररोज कचरा साचत राहतो. त्यामुळे या कच-याची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न नेहमी पडतो. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी याबाबत पुढाकार घेत शहरातील उद्यानांत गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. शहरातील ९० ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर गांडूळ खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. पंचवटीतील रासबिहारी लिंक रोडवरील प्रमोद महाजन उद्यानात प्रायोगिक तत्त्वावर या खतनिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ झाला.

उद्यानात तयार होणारा हरित कचरा त्याच ठिकाणी साचवला जाऊन त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यानंतर त्या ठिकाणी गांडूळ खतनिर्मिती केली जाईल. खताचा वापर उद्यानातील विविध वृक्षांसाठी केला जाणार आहे.