पुढील आठवडय़ात बैठक; मंगळवारचा मुहूर्त जाहीर, राजकीय नेत्यांचा बचतीवर भर
शहरात पाणीकपातीत वाढ करावी की नाही, या मुद्दय़ावरून निर्माण झालेला तिढा पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित असतानाही सुटू शकला नाही. संत निवृत्तीनाथ यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर येथे मध्यरात्री दाखल झालेले पालकमंत्री गुरुवारी दुपारी कोणताही निर्णय न घेता मार्गस्थ झाले. या मुद्दय़ावर सर्वपक्षीयांच्या बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु, तशी बैठक न बोलावता पालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा करत या बाबतचा निर्णय अधांतरी ठेवण्यात आला आहे. या विषयी निर्णय घेण्यासाठी आता मंगळवारचा मुहूर्त जाहीर करण्यात आला. पालिकेतील सत्ताधारी मनसे आणि राज्यातील सत्ताधारी भाजप यांच्या कुरघोडीच्या राजकारणात कपातीद्वारे जी बचत शक्य आहे, त्यावर अक्षरश: पाणी फेरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडीत कोंडीत सापडलेल्या पालिका प्रशासनाने या प्रश्नावर आपल्या परीने तोडगा काढण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते.
गंगापूर धरणात ३० टक्के जलसाठा असल्याने पालिकेतील सत्ताधारी मनसेने शहरात आठवडय़ातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यास भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवत कपातीची गरज नसल्याचे म्हटले होते. जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री महाजन यांनी काटकसरीने वापर केल्यास कपातीची गरज नसल्याचे पत्र पालिकेला दिले. या पत्रामुळे पालिका प्रशासनाने आजतागायत पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. २६ जानेवारी रोजी या विषयावर विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली होती. सद्यस्थितीत सुरू असलेली १५ टक्के कपात वाढविणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्यावर याबाबत निर्णय घेण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, बुधवारी अशी बैठक झाली नाही. पालकमंत्री महाजन हे रात्री दाखल झाले.
संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवासाठी आलेल्या महाजन यांनी पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना गुरुवारी त्र्यंबकला बोलावून घेतले. त्यांच्याशी काही चर्चा केल्याचे बोलले जाते. कपातीच्या मुद्यावर लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल असे सांगून त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटी लावले.
कपातीबाबत ठोस निर्णय न झाल्यामुळे प्रशासन द्विधा मनस्थितीत सापडले आहे. दुपारनंतर पालकमंत्री मार्गस्थ झाले.

कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास पुढील काळात आठवडय़ातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवावा लागेल, असा इशारा मनसेने आधीच दिला आहे. पालकमंत्र्यांनी कपातीची गरज नसल्याचे लेखी पत्र दिले असल्याने भाजपला मागे हटणे अवघड झाले आहे. या स्थितीत ३०० दशलक्ष घनफूट जादा पाणी देण्याची तयारी दर्शविली गेली. भाजप अद्याप पाणीपुरवठा बंद ठेवण्याची गरज नसल्याच्या मुद्याला धरून असल्याने बुचकळ्यात पडलेल्या पालिका प्रशासनाने हातपाय मारण्यास सुरूवात केली आहे. या संदर्भात भाजपचे आ. बाळासाहेब सानप यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी गळतीचे प्रमाण रोखल्यास आणि १५० लिटर प्रति माणशी निकषाप्रमाणे पाणी उचलल्यास शहरात कपातीची गरज भासणार नसल्याचे स्पष्ट केले. सध्या महापालिका गंगापूरमधून ११.५ ते १२ दशलक्ष घनफूट पाणी दररोज उचलते. परंतु, उपरोक्त निकषाप्रमाणे पालिकेने ८.५ दशलक्ष घनफूट पाणी उचलणे आवश्यक आहे. या संदर्भात सर्वाशी चर्चा करण्यासाठी मंगळवारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावल्याचे त्यांनी सांगितले.