डिसेंबर व जानेवारी महिन्यासाठी निर्णय ; दुष्काळ निवारणार्थ शासनाने २० कोटी द्यावे ; गंगापूर धरणातूनच शहराला सर्व पाणी देण्याचा आग्रह

शहरात जानेवारीपर्यंत आठवडय़ातील एक दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सद्य:स्थितीत दैनंदिन पाणीपुरवठय़ात १२ ते १५ टक्के कपात लागू होती. जायकवाडीला पाणी दिल्यामुळे महापालिकेच्या आरक्षण मागणीत मोठय़ा प्रमाणात कपात झाली. यामुळे ओढावलेल्या स्थितीवर वादळी चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला. पाणी पुरवठा बंद ठेवण्यासाठीचा दिवस लवकरच जाहीर केला जाईल. दोन महिन्यातील कपातीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिकेसाठी आरक्षित झालेले शंभर टक्के पाणी गंगापूर धरणातून मिळावे आणि दुष्काळ निवारणार्थ शासनाने २० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून केली जाणार आहे.
नाशिकच्या हक्काचे पाणी मराठवाडय़ाला सोडण्याच्या निषेधार्थ भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवक व खुद्द महापौर काळे कपडे परिधान करत पालिकेत दाखल झाले होते. कपातीच्या विषयावर तब्बल साडे पाच तास खल झाला. भविष्यात या पद्धतीने पाणी पळविले जाऊ नये म्हणून आवश्यक ते उपाय करण्याकडे सर्वानी लक्ष वेधले. जलवाहिन्यांमधील गळती रोखणे, उन्हाळ्यात टंचाईची दाहकता कमी करण्यासाठी शहरातील जलस्त्रोत, विहिरी, कूपनलिका अधिग्रहित करणे, टँकरचे नियोजन, पाण्याचा काटकसरीने वापर, प्रगतिपथावरील इमारतीच्या बांधकामांसाठी पाण्याच्या वापरावर प्रतिबंध, असे विविध मुद्दे सदस्यांनी मांडले. या उपायांची अंमलबजावणी करण्याचे मान्य करण्यात आले.
गंगापूर व दारणा धरण समूहातून नाशिक शहरासाठी तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर त्या अनुषंगाने कपातीचा निर्णय घेण्यासाठी सोमवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. पाणी आरक्षित करताना शासनाने मोठी कपात केल्यामुळे नाशिकच्या कपातीत वाढ करणे क्रमप्राप्त ठरले. पालिका प्रवेशद्वारावर नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निषेध सर्वपक्षीय सदस्यांनी केला. यावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. शहरात आधीपासून १२ ते १५ टक्के कपात लागू आहे. या स्थितीत उपलब्ध पाणी पुढील २५४ दिवस पुरेल या दृष्टीने नियोजन करायचे होते. यावर योग्य माहिती मिळत नसल्याने सदस्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांना धारेवर धरले. सध्याची कपात कायम ठेवल्यास उन्हाळ्यात ७० ते ८० दिवस पाण्याचा तुटवडा भेडसावणार आहे. त्यामुळे आठवडय़ातून दोन दिवस पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवणे अथवा दैनंदिन कपातीचे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांवर नेण्याचा पर्याय असल्याचे अभियंता आर. के. पवार यांनी सांगितले.
सेनेचे डी. बी. सूर्यवंशी यांनी नागरिकांकडून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय होत असल्याचे सांगून मोटार जप्त करण्याच्या कारवाईत नगरसेवकच कसे अडथळे आणतात हे कथन केले. कपात करताना पाण्याचा दाब योग्य राखला जात नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक ‘व्हॉल्व्हमॅन’ कोणती जलवाहिनी कोणत्या भागाची आहे याबद्दल अनभिज्ञ असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक सदस्यांनी शनिवार व रविवारी कपातीला विरोध दर्शविला. नोकरदार महिलांना या दिवशी सुटी असते. घरातील रखडलेली कामे त्यांना पूर्ण करायची असल्याने हे दिवस वगळून कपात करावी अशी मागणी त्यांनी केली. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता मांडण्यात आली. पालिकेने पिण्याच्या पाण्याचा वापर कचरा डेपोतील आग विझविणे वा तत्सम कामांसाठी होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. प्रगतिपथावर असणाऱ्या बांधकामांसाठी सर्रास पाण्याचा वापर होत असून त्यास तातडीने प्रतिबंध करणे, पाण्याचा अपव्यय करणारे तसेच पंप लावून पाणी खेचणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. शहरात अनेक जिवंत झरे आहेत. कुपनलीका, विहिरी अधिग्रहित करून उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा भेडसावणार नाही असा प्रयत्न करता येईल.
गंगापूर धरणात अल्प जलसाठा असल्याने उन्हाळ्यात त्यातील गाळ काढण्याचे काम करता येईल. जल वाहिन्यांमधील गळतीचे प्रमाण मोठे असून ते कमी केल्यास पाणी बचत होऊ शकेल, असे निदर्शनास आणून देण्यात आले. सदस्यांनी सुचविलेले उपाय अंमलात आणण्याची सूचना महापौरांनी केली.
डिसेंबर व जानेवारी महिन्यात आठवडय़ातून एक दिवस पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाणार असल्याचे महापौरांनी जाहीर केले. या दोन महिन्यानंतर स्थिती लक्षात घेऊन पुढील कपातीबाबत निर्णय घेतला जाईल. आठवडय़ातील कोणत्या दिवशी पाणी पुरवठा बंद ठेवायचा याबद्दल लवकरच दिवस निश्चित केला जाईल, असे मुर्तडक यांनी सांगितले. शासनाने गंगापूरमधील २७०० तर दारणा धरणातील ३०० दशलक्ष घनफूट आरक्षित केले आहे.
नाशिकसाठी आरक्षित तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणातून द्यावे, अशी मागणी शासनाकडे केली जाईल. तसेच टंचाई निवारणार्थ पालिकेला अनेक उपाय करावे लागणार आहेत. त्यासाठी शासनाने २० कोटीचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

उन्हाळ्यासाठी तयारी
नाशिकची १७ लाख लोकसंख्या गृहीत धरल्यास प्रति माणशी दैनंदिन पाणी वापर २०० लिटर इतका आहे. गंगापूर धरणातील पाण्याच्या होणाऱ्या बाष्पीभवनाशी पालिकेचा संबंध नाही. परंतु, शहरातील जलवाहिन्यांमधील पाणी गळती पालिकेशी संबंधीत आहे. १५ ऑक्टोबपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करावयाचे झाल्यास सध्याच्या प्रति दिन कपातीत वाढ करणे, अथवा एक ते दोन दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करणे असे काही पर्याय उपलब्ध आहेत. उन्हाळ्यातील स्थिती लक्षात घेऊन शहरातील विहिरी, कूपनलिका अधिग्रहित करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याची सूचना करण्यात आली आहे. उन्हाळ्यात धरणाने तळ गाठल्यास ते पाणी उचलण्यासाठी जॅकवेलचे काम करावे लागेल काय, या दृष्टीने चाचपणी केली जात आहे.
– डॉ. प्रवीण गेडाम
(आयुक्त, महापालिका)