नागरिकांना १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने उच्च न्यायालयात देऊनही १८ ते २२ दिवस उलटल्यानंतरही नियमित पाणी पुरवठा का केला जात नाही, पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक का जाहीर होत नाही, असा प्रश्न मनमाड बचाव कृती समितीच्या पथकाने नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसमोर केला. शहरास पाणी वितरण करण्याचे एक सत्र पूर्ण होऊन २० दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला असतांना प्रशासन कार्यक्षमतेने पाणी वितरण करीत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

पाणी पुरवठय़ाच्या प्रश्नावर समितीचे राजकमल पांडे, अशोक परदेशी, राजेंद्र पारिख आदींनी अभियंता शेषराव चौधरी, कार्यालयीन अधीक्षक खरोटे यांची भेट घेऊन चर्चा केली. अ‍ॅड. सागर कासार यांनी पाणीप्रश्नी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी नगर पालिकेने १० ते १५ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते. मात्र

आता १८ ते २२ दिवस उलटूनही पाणीपुरवठा सुरळीत व नियमित झालेला नाही. हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अनादर असल्याचे समितीच्या पथकाने निदर्शनास आणून दिले. तसेच सुरळीत पाणीपुरवठा करण्याबाबतचे वेळापत्रक अद्याप जाहीर केले नाही, याचाही जाब विचारण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन-तीन मुख्य जलवाहिन्यांना मोठी गळती लागलेली आहे. ती दुरूस्ती झाल्यावर ठरल्याप्रमाणे १५ दिवसाआड पाणी पुरवठा होईल. तसेच यानंतर पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर करू, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.