नऊ मे रोजी दुर्मीळ घटना पाहण्याचा योग

आकाशात सदैव काही ना काही घडत असते. अशीच एक महत्वपूर्ण घटना येत्या सोमवारी, नऊ मे रोजी घडणार असून, या दिवशी बुध ग्रहाचे सूर्य बिम्बावरून अधिक्रमण होणार असल्याची माहिती येथील खगोल अभ्यासक प्रा. गिरीश पिंपळे यांनी दिली आहे.

सूर्याला सर्वात जवळ असलेला ग्रह म्हणून बुधाची ओळख आहे. त्याचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर पाच कोटी ८० लाख किलोमीटर आहे. सुमारे २४४० किलोमीटरची त्रिज्या असलेला बुध सूर्याभोवती ८८ दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्याभोवती फिरत असताना तो काही वेळा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मधून जातो.

या वेळेला आपण सूर्याकडे पाहिले, तर आपल्याला सूर्य बिम्बावरून एक अगदी बारीक काळा ठिपका सरकताना दिसतो. हा ठिपका म्हणजे बुध ग्रह. बुधाचे सूर्य बिम्बावरून हे सरकत जाणे म्हणजे त्याचे अधिक्रमण. ही घटना अतिशय दुर्मीळ मानली जाते. शतकात १३ किंवा १४ वेळाच अशा प्रकारचे अधिक्रमण होते.

नऊ मे रोजी दुपारी चार वाजून ३२ मिनिटांनी हे अधिक्रमण सुरू होईल. सुरूवातीला म्हणजे सूर्याच्या परिघाजवळ असताना बुध स्पष्ट दिसणार नाही. तो जसजसा पुढे सरकू लागेल तसा स्पष्ट दिसू लागेल अशी अपेक्षा आहे. हा ठिपका अतिशय लहान असल्याने तो प्रयत्नपूर्वक पाहावा लागेल. याच वेळेला सूर्यावर काही काळे डागही अगदी छोटय़ा स्वरुपात दिसू शकतात. परंतु हे डाग अनियमित आकारचे असतील.

बुधाचा ठिपका मात्र गोलाकार असेल. शिवाय तो आपली जागा बदलत राहील. संध्याकाळी सहा वाजून ३० मिनिटे होतील तेव्हा बुधाने सूर्य बिम्बावर साधारणपणे एकचतुर्थाश अंतर कापलेले असेल. सूर्यास्तानंतर हे दृश्य दिसणार नसल्याने एकंदरीत संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत ही घटना नीट पाहता येईल. मध्यरात्री ही घटना समाप्त होईल, असे प्रा. पिंपळे यांनी म्हटले आहे.

हे अधिक्रमण पाहताना काळजी घेण्याचा सल्लाही पिंपळे यांनी दिला आहे. दुर्बिणीवर योग्य त्या दर्जाचा सोलर फिल्टर बसवून हे अधिक्रमण पाहणे योग्य ठरेल. हे काम तज्ज्ञ व्यक्तीनेच केले पाहिजे.

अधिक्रमण पाहण्याचा दुसरा मार्ग म्हणजे साध्या किंवा अंतर्गोल आरशाने सूर्याची प्रतिमा तयार करून ती भिंतीवर किंवा अन्य सपाट पृष्ठभागावर घेणे आणि त्या प्रतिमेचे निरीक्षण करणे. अंतर्गोल आरसा वापरणे चांगले. कारण, त्यामुळे मोठी प्रतिमा मिळेल. दुर्बिणीत तयार होणारी प्रतिमाही या पद्धतीने वापरता येईल.