मुख्यमंत्र्यांचे लासलगाव बाजार समिती शिष्टमंडळास आश्वासन
कांद्याचे कमी झालेल्या दरामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि कांदा उत्पादकांच्या इतर समस्यांविषयी पंतप्रधानांशी दोन-तीन दिवसात चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रविवारी लासलगाव बाजार समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या.
काही महिन्यांपासून कांद्याचे दर प्रतिक्विंटल रूपये ७००-७५० पर्यंत खाली आले आहेत. कांदा शेतातून बाजार समितीपर्यंत नेण्याचा खर्चही वसूल होत नसल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा पुन्हा घरी परत नेण्याच्या घटना घडल्या आहेत. टंचाई, दुष्काळी परिस्थिती आणि त्यातच भाव नसल्याने कांदा उत्पादकांवर ओढवलेल्या परिस्थितीची जाणीव शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना करून दिली. कांद्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यातीवर अनुदान द्यावे, बाजार हस्तक्षेप योजनेसारखा एखादा निर्णय घेऊन दरात वाढ करून कांदा उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा द्यावा, जिल्ह्य़ातील कृषी उत्पादकांच्या स्थितीविषयी केंद्रातील मंत्र्यांशी चर्चा करावी अशा मागण्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादकांच्या समस्यांविषयी पंतप्रधानांशी यासंदर्भात चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.