सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवणाऱ्या लेकीवर माहेरच्या मंडळींनी तिच्या सासरच्या अंगणातच अंत्यसंस्कार केल्याची घटना नाशिमध्ये घडली. नाशिकमधील वाडीवऱ्हे येथील एका विवाहितेने रविवारी आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसात धाव घेत सासरच्या मंडळींवर संशय घेत त्यांना अटक करण्याची मागणी केली. पण पोलिसांनी संशयितांवर वेळेत कारवाई केली नाही. त्यानंतर लेकीच्या मृत्यूचा संताप व्यक्त करण्यासाठी माहेरच्या मंडळींनी मुलीचा मृतदेह सासरी नेला. तिच्या  घराच्या अंगणातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी मालूंजकर (वय २३) असं मृत विवाहितेचे नाव असून रविवारी रात्री विष पिऊन तिने आयुष्य संपवले. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून नंदिनीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केलाय. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात पती आणि सासू-सासरे यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी या मंडळींवर कारवाई करण्यात तत्परता दाखवली नाही.

नंदिनीवर सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केल्यानंतर पोलिसांनी तिच्या सासू-सासऱ्यांना ताब्यात घेतले असून तिचा पती फरार आहे. नंदिनीला दोन महिन्यांचा मुलगा असून या घटनेनंतर तिच्या माहेरच्या लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.