नाशिकमध्ये उद्यापासून जागतिक शांतता परिषदज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना पुरस्कार

विविध कारणांमुळे अशांततेच्या गर्तेत सापडलेल्या जगाला शांततेच्या मार्गावर नेण्यासाठी शिक्षणाचा कसा वापर करता येईल, या विषयावर मंथन करण्याच्या उद्देशाने २४ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत येथे ‘सुशासन आणि अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एज्युकेटर्स फॉर वल्र्ड पीस आणि गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे आयोजित १९ वी जागतिक शांतता परिषद प्रथमच महाराष्ट्रात होत आहे. तिचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार असून शांतता या विषयाबद्दल आस्था असणारे जगभरातून तज्ज्ञ त्यात सहभागी होत आहेत. त्या अंतर्गत शांतता व अहिंसा यावर आधारित अभ्यासक्रमांची निर्मितीबद्दल मंथन होणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीतर्फे देण्यात येणाऱ्या पहिल्याच ‘सर डॉ. एम. एस. गोसावी एक्सलन्स अवॉर्ड’ ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांना जाहीर करण्यात आला.

जगातील अनेक भागांत सध्या अशांतता आणि तणाव आहे. तळेगाव प्रकरणानंतर तशीच अशांतता स्थानिक पातळीवर अनुभवयास मिळाली. साक्षरतेचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे हिंसात्मक मार्गाचा अवलंब वेगाने वाढत आहे. दहशतवादी कारवायांमुळे निम्मे जग अशांत आहे. या पाश्र्वभूमीवर शिक्षणातून शांततेचे जागरण घडविण्याच्या उद्देशाने ही परिषद होत असल्याचे गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी आणि प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी सकाळी दहा वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात डॉ. गोसावी पुरस्काराचे राज्यपालांच्या हस्ते वितरण करण्यात येईल. एक लाख रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

संयुक्त राष्ट्र संघाचा ७१ वा स्थापना दिवस आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्ष यांचे औचित्य साधून होणाऱ्या परिषदेचे यजमानपद एचपीटी आणि एमएमआरके महिला महाविद्यालय भूषवित आहे. शांतताविषयक आस्था असणारे १५० प्रतिनिधी आणि २५ तज्ज्ञ यात सहभागी होतील. त्यात तैवानमधील चेन्गाची विद्यापीठाचे डेव्हिड ब्लन्डेल, शांततवादी कार्यकर्ते हु जी वांग, अमेरिकेतील शांततावादी कार्यकर्ते डॉ. लज उतरेजा, डॉ. नीना मेयरहॉफ, लेखिका डेम मेबेल कात्झ, अणुशास्त्रज्ञ शंकरराव गोवारीकर, न्या. जयंतराव चित्रे आदींचा समावेश आहे. परिषदेत एकूण नऊ तांत्रिक सत्र व गटवार चर्चा होईल. त्यातून समोर येणारे निष्कर्ष अहवालाद्वारे संयुक्त राष्ट्र संघाला सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. परिषद यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. दीप्ती देशपांडे, हंप्राठा व रायक्ष महाविद्यालयाचे व्ही. एन. सूर्यवंशी, संयोजक डॉ. विवेक बोबडे आदी प्रयत्नशील आहेत. पत्रकार परिषदेत पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. प्रा. वृंदा भार्गवे यांनी प्रास्ताविक केले.