विविध क्षेत्रात आकर्षक नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याने अलिशान जीवनशैलीस भुललेल्या युवकांची प्रतिष्ठेच्या पण खडतर सेवा मानल्या जाणाऱ्या सैन्य दलात दाखल होण्याची उर्मी कमी होत असल्याचे निरीक्षण मध्यंतरी संरक्षण विभागाने नोंदविले होते. तथापि, त्यास छेद देण्याचे काम नाशिकच्या उत्कर्ष दिवाणे या विद्यार्थ्यांने केले आहे. औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश रद्द करत बालपणापासून पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) दाखल होत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रवेश परीक्षा आणि मुलाखत हे टप्पे त्याने पार केले आहेत.
अलिकडच्या काळात भरभक्कम पगार आणि शांत जीवन जगण्याकडे बहुतेकांचा कल असल्याने सैन्य दलास अधिकारी व जवान मिळणे अवघड झाले आहे. तरुणांना भरभक्कम पगाराच्या नोकरीचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्याचा विचार करून शिक्षणाला प्राधान्य दिले जाते. आजही बारावीनंतर मळलेली वाट निवडणारे हजारो विद्यार्थी आहेत. त्यासाठी पालकांची लाखो रुपये शुल्क मोजण्याची तयारी असते. काही तरूण मात्र त्यास अपवाद ठरतात. उत्कर्ष हा त्यापैकीच एक. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल होण्यासाठीची केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रवेश परीक्षा तसेच मुलाखत प्रक्रिया उत्तीर्ण होऊन त्याने एनडीएच्या १३५ व्या तुकडीसाठी गुणवत्ता यादीत २३५ वा क्रमांक पटकावला. मुलाखतीसाठी त्याला पुण्याच्या लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राम्हणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
उत्कर्षचे शालेय शिक्षण नाशिकच्या सिम्बॉयसिस शाळेत तर इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण आरवायके महाविद्यालयात झाले. शालेय जीवनापासून त्याला फुटबॉल. व्हॉलीबॉल, बास्केटबॉल तसेच गिर्यारोहण व वाचनाची आवड होती. त्याचे वडील मिलिंद दिवाण हे अभियंता तर आई सुहासिनी या इंग्रजीच्या अध्यापिका आहेत. बहिण औषध निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या निवडीचे श्रेय तो आजोबांची प्रेरणा आणि कुटुंबियांना देतो. अहमदनगरच्या लष्कराच्या चिलखती वाहन विभागात आजोबा रणगाडे डिझाईनचे काम करायचे. त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची जीवनशैली जवळून पाहिली होती. लहानपणापासून त्यांनी लष्करातील करिअरसाठी प्रेरणा दिली.
एनडीएमध्ये दाखल होताना आपल्याला आवडीच्या शाखेत प्रवेश मिळाला. तीन वर्षांचे प्रशिक्षण झाल्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमीत दाखल होऊ. त्यानंतर ‘पॅराट्रुपर्स’ व्हायला आवडेल असेही तो म्हणाला. ‘एनडीए’साठी तयारी करण्याआधी विद्यार्थ्यांनी प्रथम ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. या ठिकाणी निवडीसाठी इच्छाशक्ती आणि तयारीत सातत्य महत्वाचे आहे. तसेच आपल्या शारीरिक क्षमताही वाढवायला हव्यात, याकडे त्याने लक्ष वेधले. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सैन्य दलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उत्कर्षची निवड प्रेरणादायक आहे.