पनवेल तालुक्यामधील नांदगाव गावातील खुटले कुटुंबीयांनी शंभर रुपयांच्या नोटांचे मखर केले आहे. यासाठी खुटले कुटुंबीयांचे सुमारे दीड लाख रुपये खर्च झाले आहेत. खऱ्या नोटांची ही आरास पाहण्यासाठी तालुक्यातील गणेशभक्तांचे पाय खुटलेंच्या घराकडे वळत आहेत. देवासाठी काय पण.. हीच श्रद्धा बाळगून ही आरास केल्याचे या कुटुंबातील विनोद खुटले यांनी सािंगतले. पनवेलच्या नांदगावात अनेक गणेशभक्त आहेत. ४५ वर्षांपासून खुटले यांच्या घरी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा होत असून यंदाची आरास विशिष्ट पद्धतीने करायची ही भावना ठेवून ही सजावट केली आहे. यातील प्रत्येक नोटेला टाचणी लावल्याने त्या पुन्हा वापरात येणार आहेत. यासाठी शंभर रुपयाच्या तब्बल चौदाशे नोटा वापरण्यात आल्या आहेत. या मखरामध्ये पाच व दहा रुपयांची नाणीही वापरण्यात आली आहेत. हे श्रीमंती मखर आणि त्यामध्ये विराजमान झालेले गणराय पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.