मॅकेमको कंपनी, कपडय़ाचे दुकान भस्मसात

दिवाळीच्या चार दिवसांमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत पंधरा ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या मध्ये मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी झाली असली, तरी जीवित हानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नेरुळ सेक्टर २८ मधील सद्गुरू अपार्टमेंटच्या समोरील झोपडपट्टीमध्ये १७ ऑक्टोबरला फटाक्यांमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणात आणली. सीवूड्स सेक्टर ४२ ए गणपती अपार्टमेंटच्या समोरील झोपडय़ांनाही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आग लागली. याच दिवशी तुर्भे एमआयडीसीमधील मॅकेमको कंपनीलाही आग लागल्याने कंपनी भस्मसात झाली. कंपनीमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याची ठिणगी पडून रसायनाचा स्फोट झाल्याने आग सर्वत्र पसरली. तीन तासांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली.

अन्य एका घटनेमध्ये जुईनगर सेक्टर २४ मधील सुंदरम सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर शुक्रवारी आग लागली. पेट्रोल पंपाजवळच आग लागल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रॉकेटमुळे ही आग लागल्याचा अंदाज रहिवाशांनी व्यक्त केला. त्यानंतर तुर्भेमधील जनता मार्केटमध्येही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री कपडय़ाचे दुकान भस्मसात झाले. महादेव कलेक्शन या कपडय़ाच्या दुकानाला पहाटे पाच वाजता आग लागली. ही आगही फटाक्यांमुळे लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीत सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अशा प्रकारे नवी मुंबईमध्ये चार दिवसांत जवळपास पंधरा ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. सर्वाधिक सात घटना वाशी परिसरामध्ये घडल्या. यानंतर पाच घटना नेरुळ अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रामध्ये घडल्या असून, तीन घटना ऐरोलीच्या कार्यक्षेत्रामध्ये घडल्याची नोंद झाली आहे.