नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मंगळवारी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे. यावरून जोरदार राजकीय हालचालींना वेग आला असताना मुंढे यांच्या समर्थनार्थ संवेदनशील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर पालिका मुख्यालयासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पोलिसांनी पालिका मुख्यालयापासून १०० मीटर अंतरावर येण्यास मज्जाव केला आहे. याशिवाय मुख्यालयासमोर पार्किंग आणि खासगी वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. परिमंडळांचे उपायुक्त आणि २०० पोलीस मंगळवारी बंदोबस्तावर असतील. पालिकेतील लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

आयुक्तांच्या दालनात कोणत्याही व्यक्तीला प्रवेश बंदी असेल. महासभेच्या आवारात त्याचबरोबर प्रेक्षक गॅलरीत पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. तर मुंढेंच्या दालनाबाहेर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खासगी सुरक्षादेखील तैनात असणार आहे. काही नागरिकांनी व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुक वा इतर समाजमाध्यमांवरून मुंढे यांच्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.