पाणी जपून वापरा!

सिडकोचे पेण येथील हेटवणे धरण जवळपास भरायला आलेले असताना नवी मुंबई पालिकेच्या खालापूर येथील मोरबे धरणात अद्याप ७१ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) जलसाठा आहे. धरण भरण्यास १९१ एमसीएम पाणीसाठा लागत असल्याने नवी मुंबईकरांना पुढील वर्षीही पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. पावसाळ्याचे दोन महिने सरत आल्यानंतरही ही स्थिती असल्याने या चिंतेत अधिक भर पडली आहे. दोन वर्षांपूर्वी याच काळात धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले होते मात्र यंदा ही संधी हुकणार असल्याचे दिसून येत आहे. गेले आठवडाभर या भागात कमी पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याची पातळी ७३ दशलक्ष घनमीटरवर गेलेली नाही.

मुंबई पालिकेनंतर स्वत:चे धरण असलेली नवी मुंबई पालिका ही राज्यातील एकमेव पालिका आहे. जलसंपदा विभागाकडून विकत घेण्यात आलेल्या खालापूर तालुक्यातील या धरणामुळे नवी मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य होते. मात्र गतवर्षी या धरण क्षेत्रात कमी पाऊस पडल्यामुळे यंदासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे पालिकेला तीस टक्क्यांपर्यंत पाणीकपात करावी लागली. ही कपात कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न असून शहराच्या अंतर्गत भागात जाणाऱ्या जलवाहिन्या छोटय़ा असल्याने पालिकेला ही सुविधा देता येत नाही. त्यामुळे केवळ ६० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा झाला असून अद्याप ४० टक्के भागात एक वेळ पाण्याची आबाळ आहे.

अनेक ठिकाणी उंच इमारतीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे गृहिणींना आजही पाण्यासाठी रात्र जागावी लागत आहे. त्यात आता मोरबे धरणातील पाणीसाठा अद्याप आवश्यक इतका झाला नसल्याने ही कपात काही प्रमाणात कायम आहे. बुधवारी पालिकेने धरणातील पाण्याची नोंद केली.