आवक जास्त झाल्याने फेकून देण्याची वेळ

मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांना दररोज लागणाऱ्या कांद्यापेक्षा जास्त आवक तुर्भे येथील कांद्याच्या घाऊक बाजारात झाल्याने बुधवारी आलेल्या कांद्यापैकी ४० ट्रक कांदा पडून आहे. या कांद्याला वेळीच उठाव न मिळाल्याने तो उकिरडय़ावर फेकून देण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत. देशात यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने राज्यातील कांद्याची निर्यात रोडावली आहे. पाच पैसे किलोने कांदा विकण्याची वेळ नाशिक येथील शेतकऱ्यांवर आली आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारात हा दर सहा रुपये प्रति किलो आहे.

राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झालेले आहे. ऊसाला पाणी जास्त लागत असल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पन्न घेतल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे जाणकारांचे मत आहे. राज्यात कांद्याचे उत्पन्न वाढले असताना देशातील १३ राज्यांतही हीच स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे एकंदरीत देशातच यंदा दोन लाख टनांपेक्षा जास्त कांद्याचे उत्पन्न झालेले आहे. देशात असा विक्रमी कांदा तयार होत असताना पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान या ठिकाणीही कांदा जास्त पिकविला गेला असल्याने देशातील कांद्याला परदेशातील बाजारपेठा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक राज्यात कांद्याचा अतिरिक्त साठा पडून असल्याने नाशिक व पुण्यातून दररोज १२५ पेक्षा जास्त ट्रक भरून कांदा तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात येत आहे.

मार्च ते मे दरम्यान चाळीत ठेवण्यात आलेल्या कांद्याला पावसाची झळ पोहोचल्याने चाळीमध्ये साठवलेला कांदा सडू लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकाच वेळी बाजारात कांदा पाठविण्यास सुरुवात झाली आहे. एमएमआरडीए क्षेत्रासाठी दररोज ७० ट्रक भरून कांदा लागत असल्याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे सध्या दुप्पट गाडय़ा अतिरिक्त येत असून कांद्याला उठाव असल्यास व्यापारी तो उतरवून घेत आहेत नाही तर तो गाडीतच ठेवण्याची विनंती केली जात आहे.

पुरवठा जास्त आणि मागणी कमी असे समीकरण काही काळ सुरू राहिल्यास कांदा बाजारात उकिरडय़ावर फेकून देण्याची वेळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर येणार आहे.

राजेंद्र शेळके, कांदा व्यापारी, एपीएमसी, तुर्भे.