डेंग्यूचे ६३ संशयित रुग्ण; वैद्यकीय उपाययोजनांबाबत अधिकारी मात्र ढिम्मच

पनवेल शहर महानगरपालिकेत खारघरचा समावेश नको, असा सिडकोचा आग्रह आहे. राज्य सरकारकडे तसा तो वारंवार सिडको प्रशासनाने मांडला  आहे; परंतु त्यांनी उभारलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी मात्र सिडकोने आग्रह धरलेला नाही. खारघरमध्ये डेंग्यूसदृश्य साथीने थैमान घातले आहे; मात्र ती आटोक्यात आणण्यासाठी सिडको अधिकारी ढिम्म हललेले नाहीत.

water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका
One lane of Gokhale bridge opened today
गोखले पुलाची एक मार्गिका आज खुली; अंधेरी पूर्वपश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा
New Town on Green Belt in Navi Mumbai The reservation of park in the municipal development plan has been cancelled
नवी मुंबईतील हरित पट्ट्यावर नवे नगर; शिळच्या सीमेलगत नागरी वसाहतींचा मार्ग मोकळा

वसाहतीतील सेक्टर ३५, २०, २१, १२, १४, १८ या ठिकाणी सर्वाधिक डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. हा आकडा ६३ इतका आहे. सुमारे एक लाख २५ हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतींत केवळ २५ आरोग्यसेवकच काम करीत आहेत. त्यामुळे चार हजार २०० नागरिकांमागे अवघा एक सेवक असे गुणोत्तर आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सिडकोने उभारलेले नागरी आरोग्य केंद्र कुचकामी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या खारघरमधील रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये शरीरातील प्लेटलेट्स (पेशी) कमी होण्यामुळे अशक्तपणा, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीसारखे त्रास होत आहेत. दोन आठवडय़ांपासून शहरातील सर्व दवाखान्यांमध्ये डेंग्यूसदृश तापावर उपचार घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येथील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांविरोधात भाजपच्या प्रतिनिधींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सिडकोने खारघर वसाहत उभारल्यानंतर १५ वर्षांनी नागरी आरोग्य केंद्र उभारले; परंतु दरवेळी उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी सिडकोने कोणत्याही उपाययोजना हाती घेतलेल्या नाहीत. त्याऐवजी सिडकोने हंगामी तत्त्वावर कर्मचारी ठेवले आहेत.

यावर रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर भाजपने आंदोलनासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर प्रशासनातील आरोग्य विभागाने हा प्रश्न गंभीर असल्याचे  मान्य केले. गुरुवारी नागरी आरोग्य केंद्रात रक्तातील पेशींची संख्या निश्चित करणारी सूक्ष्मदर्शिका बसवली. तरीही वसाहतीतील रहिवाशांच्या आरोग्याप्रति सिडको गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला.

सध्या खारघरमध्ये डेंग्यूचे ६३ संशयित रुग्ण आहेत.  कळंबोलीत चार रुग्ण आहेत. कामोठेमध्ये तीन, तर नवीन पनवेलमध्ये ११ रुग्णसंख्या आहे.  सिडकोच्या आरोग्य विभागाने कुठेही दिरंगाई केलेली नाही. सध्या सेक्टर २० व २१ मध्ये जंतुनाशक फवारणी, जनजागृती, आरोग्य सेवकांमार्फत घरोघरी जाऊन ‘कंटेनर सर्वेक्षणा’चे काम सुरू आहे.

–  डॉ. बी. एस. बावस्कर  आरोग्य अधिकारी, सिडको