नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात तिरंगी रोषणाई

भारताच्या ७१व्या स्वातंत्र्यदिनी मंगळवारी नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आणि अन्य ठिकाणी तिरंग्याला अभिवादन करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात महापौर सुधाकर सोनवणे यांनी तर पनवेल महापालिकेत महापौर कविता चौतमोल यांनी ध्वजारोहण केले. कोकण भवन येथे महिला आणि बालविकास राज्य मंत्री विद्या ठाकूर यांनी ध्वजारोहण केले.

नवी मुंबई महापालिकेतील ध्वजारोहण समारंभाला उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, मोटारसायकलस्वार आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. महानगरपालिकेच्या इतर कार्यालयांतही पालिका अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महापालिका मुख्यालयात तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाई १६ ऑगस्टपर्यंत ठेवण्यात येणार आहे. झळाळणारे महापालिका मुख्यालय बघण्यासाठी अनेकांनी महापालिका मुख्यालय परिसरात गर्दी केली होती.

कोकण भवन येथे विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनानिमित्त कोकण भवनच्या प्रांगणात महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नवी मुंबई पोलीस पथक, सीबीडी बेलापूर येथील भारती विद्यपीठ, पीपल्स हायस्कूल व ज्ञानपुष्प विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलिसांचा गौरव करण्यात आला.

स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाइकांची सलामी

पनवेल : पत्रयुद्ध आणि वादविवादांवर पडदा टाकत पनवेलच्या महसूल विभागाने आणि महापालिकेने ७१वा स्वातंत्र्यदिन सोहळा तालुका क्रीडा संकुलाच्या प्रांगणात एकत्रितपणे साजरा केला. महसूल विभागाने आयोजित केलेल्या या सोहळ्यात पनवेलमधील स्वतंत्रसैनिकांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीमुळे वेगळेच वलय लाभले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी महसूल विभागाच्या ध्वजारोहणाला हजेरी लावल्यामुळे महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह अनेक नगरसेवकांना तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी सव्वानऊ वाजता हजर राहणे भाग पडले. उपविभागीय अधिकारी भरत शितोळे, तहसीलदार दीपक आकडे यावेळी उपस्थित होते.

दत्तात्रेय गोखले यांनी गोवा येथे केलेले आंदोलन आणि त्यावेळी सोडण्यात आलेल्या अश्रुधुरामुळे त्यांच्या डोळ्यांना झालेली इजा, याची आठवण त्यांच्या कुटुंबातील ८२ वर्षीय सुनीता दत्तात्रेय गोखले यांनी सांगितली. स्वातंत्र्यसैनिक परशुराम गोडबोले यांनी स्वतंत्र्याविषयी जनजागृती करणारी भित्तीपत्रके रात्री लावण्याचे आणि प्रसिद्धीपत्रक वाटण्याचे जोखमीचे काम केल्याची माहिती ८५ वर्षीय जानकी गोडबोले यांनी दिली. शांताराम अच्युत वालावलकर यांचे ५४ वर्षीय पुत्र शाम वालावलकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पनवेलमध्ये सत्याग्रह करताना झालेल्या लाठीमारात वालावलकरांच्या हाताची बोटे तुटली. त्यानंतर ते वरळी कारागृहात सहा महिने होते, अशा आठवणींना शाम यांनी उजाळा दिला.

यावेळी पोलीस अधिकारी सुनील बाजारे, मालोजी शिंदे व जयराज छापरीया उपस्थित होते. ध्वजारोहणात वापरलेला ड्रोन कॅमेराने उपस्थितांचे लक्ष वेधले. मैदानात भव्य ध्वजस्तंभ उभारण्याचे आणि चिखल, गवताने भरलेल्या मैदानाला भव्य प्रांगणाचे रूप देण्याचे काम महसूल विभागाने यशस्वीरीत्या पार पाडले.

खारघर येथील सेक्टर १० मधील सिडको उद्यानात ध्वज उलटा फडकत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकले. त्यानंतर आयोजकांनी सारवासारव केली. ध्वजारोहणानंतर काही लहान मुलांनी ध्वज खाली उतरवला आणि उलटा फडकवून निघून गेले, असे स्पष्टीकरण आयोजकांतर्फे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नरेश ठाकूर यांनी दिले. त्यानंतर ध्वज पुन्हा योग्य स्थितीत आणण्यात आला.

स्वातंत्र्यदिनी पनवेलकर पाण्याविना

पनवेल : दिवसातून अवघे दोन तास पाणी मिळणाऱ्या पनवेलकरांना स्वातंत्र्यदिन पाण्याविनाच साजरा करावा लागला. एरव्ही सकाळी ११ वाजता येणारे पाणी मंगळवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत न आल्याने पनवेलकरांच्या तोंडचे पाणी पळाले. मिडलक्लास या बंगले व लहान रो हाऊसच्या सोसायटीला याचा फटका बसला.

मिडलक्लास सोसायटीच्या परिसरात अनेक राजकीय नेत्यांची निवासस्थाने आहेत. शहरातील पाणीटंचाईची दखल घेण्यास या नेतेमंडळींनी तरी पालिकेला भाग पाडावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

पनवेलकरांचा पाणीप्रश्न सोडण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता. त्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक लावली होती, तरीही पनवेलकरांचा स्वातंत्र्यदिन पाण्याविनाच गेला.

मिडलक्लास सोसायटी परिसरातील पाण्याच्या टाकीला पाणीपुरवठा करणारा विजेचा पंप बिघडल्यामुळे हा घोळ झाला. तसेच सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे पंप दुरुस्त करण्यासाठी तंत्रज्ञ मिळण्यास उशीर झाला. तंत्रज्ञ मिळाल्यानंतर पंप दुरुस्त करण्यात आला, तरीही पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास संध्याकाळ झाली.

– धर्मराज अलगट, पाणी पुरवठा विभाग, पनवेल पालिका