पहिल्या तीन दिवसांत साडेतीन हजार पनवेलकरांनी लाभ घेतला
पनवेलमध्ये एनएमएमटीच्या माध्यमातून नव्याने सुरू झालेल्या बससेवेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या तीन दिवसांतच या बसमधून तब्बल साडेतीन हजार पनवेलकरांनी प्रवास केल्याने या सेवेची गरज अधोरेखित झाली आहे. यातून एनएमएमटीला सुमारे ३३ हजार रुपयांचे उत्पन्न झाले असून हा आकडा वाढतच जाण्याची चिन्हे आहेत.
मीटरप्रमाणे भाडे आकारणी न करणाऱ्या आडमुठय़ा रिक्षाचालकांमुळे सर्वसामान्य प्रवासी कमालीचे हैराण झाले होते. या पाश्र्वभूमीवर सिटीझन्स युनिटी फोरम या संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे येथे अंतर्गत वाहतूक सेवा पुरविण्यास एनएमएमटीने तयारी दर्शवली. गेल्या शुक्रवारी पनवेल स्थानक ते साईनगर या पहिल्या मार्गावरून या सेवेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी साडेआठशे प्रवाशांनी तिचा लाभ घेतला. त्यानंतरच्या दोन दिवसांत या संख्येत भर पडून सरासरी बाराशे प्रवाशांनी या सेवेला पसंती दिली. एनएमएमटीला पहिल्या तीन दिवसांत यातून ३३ हजार रुपयांची कमाई झाली आहे. हे उत्पन्न प्रतिकिलोमीटर साडेचोवीस रुपये आहे, मात्र यासाठी प्रतिकिलोमीटर ५३ रुपये खर्च होत असल्याने ही तूट भरून काढण्याचे आव्हान एनएमएमटीसमोर असेल. यासाठी पनवेलमधील अन्य मार्गावरून ही सेवा सुरू करण्याबाबत त्यांना विचार करावा लागेल.

पालिकेच्या नाकर्तेपणामुळे नामुष्की
पनवेलच्या रस्त्यांवरील खड्डे, बेशिस्त वाहनचालक, वाहनतळ नसलेल्या इमारती आदी आव्हाने या सेवेसमोर आहेत. पनवेलमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका या सेवेला रविवारी बसला. या बसच्या मार्गात रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली वाहने न हटल्याने या सेवेची एक फेरी रद्द करण्याची नामुष्की रविवारी ओढवली. पनवेलमधील अन्य रस्त्यांप्रमाणे स्वामी नित्यानंद मार्गावरही दोन्ही बाजूला वाहने उभी केली जात असल्याने तेथे सतत वाहतूक कोंडी असते. वाहतूक पोलिसांनी तेथे एक कर्मचारी नेमला आहे. मात्र तेथून मार्गक्रमण करणे या बससाठी आव्हानात्मक ठरत आहे. या मार्गावर अनेक इमारती असून त्यातील बहुतांश ठिकाणी वाहनतळे नसल्याने सर्व प्रकारची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. याच मार्गावर असणाऱ्या सहस्रबुद्धे रुग्णालयाचेही स्वत:चे वाहनतळ नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या गाडय़ा रस्त्यावरच विसावलेल्या असतात. पनवेल नगरपालिकेने कठोर उपाययोजना केल्यास ही परिस्थिती बदलण्यास मदत होऊ शकेल.