महात्मा गांधी स्मृती रुग्णालयात जखमींवर दोन तासांनी उपचार

वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) दरवर्षी न चुकता रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान हाती घेऊन अपघात टळण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळण्यासाठी जनजागृतीचे उपक्रम राबवितात, परंतु रविवारी सकाळी पुणे -मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघाताने आरोग्य यंत्रणेच्या सुस्ताईची लक्तरे वेशीवर टांगली गेली. रविवारी घडलेल्या या अपघातामध्ये एकाचा बळी गेला, तर तीनजण जखमी आहेत.

रविवारी सकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील शेडूंग फाडय़ाजवळ ऑडी कारने फॉक्सव्ॉगन कारला मागून धडक दिली. यात फोक्सव्ॉगनचा चालक भावेश गादेर (४५, रा. चिंचवड) हा जबर जखमी झाला. त्याच्यासोबत त्याची पत्नी सीमा हिलाही डोक्याला आणि छातीला मार लागला.

गादेर दाम्पत्यासोबत त्यांच्या दोन मुली पार्थवी व जीवन या कारमधून बाहेर फेकल्या गेल्या. द्रुतगती महामार्गालगतच्या दुभाजकाजवळ असणाऱ्या दहा फुटी खड्डय़ात त्या दोघी जखमी अवस्थेत पडल्या. यावेळी या मार्गावरून नऊच्या डय़ुटीवर जाण्यासाठी एका खासगी वाहनातून पोलीस नाईक राज हांदे व दिगंबर होडके हे पोलीसचौकीत जात होते. हे दोघेही अपघात पाहून मदतीसाठी उतरले. ऑडी कारमधील चालक अर्जुन शहा हासुद्धा जखमी अवस्थेत होता. मात्र तुलनेत त्याला कमी मार लागला होता. मदतीचे कार्य सुरू झाले.

पोलिसांनी खड्डय़ात उतरून पाठीवर बांधून जखमी दोन्ही मुलींना खड्डय़ाबाहेर काढले. सीमा व भावेश यांनाही गाडीबाहेर काढले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी अनेक वाहनचालकांना विनंती केली, मात्र वाहने थांबली नाहीत. अखेर आयआरबी कंपनीचे शीघ्र कृती दलाचे पथक, वाहतूक पोलीस व एका खासगी इनोव्हा कारमधून जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

एमजीएम रुग्णालयात अपघातग्रस्तांना उपचारासाठी आणल्यानंतर संबंधित व्यक्तींनी किंवा पोलिसांनी संबंधित रुग्णाचे केसपेपर काढण्याचा नियम रुग्णालयाने बनविला आहे. तोपर्यंत एमजीएम रुग्णालयात जखमींवर बाह्य़ रुग्ण सेवेत उपचार सुरू झाले होते. येथील डॉक्टरांनी भावेश यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर सीमा, पार्थवी आणि जीवन यांना गंभीर दुखापत झाल्याने सीटी स्कॅन यंत्रावर तपासणी करण्याची वेळ आली. त्यावेळी रुग्णालयाने सीटी स्कॅन मशीन बंद असल्याचे सांगून रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला पोलिसांना दिला. विशेष म्हणजे एमजीएम रुग्णालयाच्या मालकीची रुग्णवाहिका नसल्याचे या पोलिसांना सांगण्यात आले.

अखेर १०८ क्रमांकावर फोन केल्यानंतर रुग्णवाहिका डायघर येथून येईपर्यंत थांबा, असे पोलिसांना सांगण्यात आले. अखेर पनवेलचे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर बी.एस. लोहारे यांना पोलिसांनी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य सांगितल्यावर डॉक्टरांनी घटनास्थळी पाच मिनिटात रुग्णवाहिका आली. अखेर दुपारी ११ वाजता नेरुळ येथील तेरणा रुग्णालयात तब्बल दोन तासांनी या जखमींवर उपचार सुरू झाले. अपघातानंतर पोलिसांची सतर्कता कामी आली, मात्र आरोग्य यंत्रणेला याचे सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘हलगर्जी नाही’

महात्मा गांधी स्मृती रुग्णालयाचे (एमजीएम हॉस्पीटल) वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. आर. सलगोत्रा म्हणाले, की आमच्या रुग्णालयाची सीटीस्कॅन मशीन रविवारी एका दिवसासाठी बंद होती, ती सोमवारी दुरुस्त करण्यात आली. आता ती सुरू आहे; परंतु संबंधित रुग्णांचे एमआरआय करण्याचे आदेश दिले होते. एमजीएम रुग्णालयाच्या न्यूरोसर्जनने साहाय्यकांच्या मदतीने अपघातग्रस्तांवर उपचार सुरू केले. कोणताही हलगर्जीपणा  रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून वा कर्मचाऱ्यांकडून झालेला नाही. एमजीएम रुग्णालयाची रुग्णवाहिका २४ तास रुग्णांसाठी उपलब्ध असते.  पुढील उपचारांची सूचना केल्यानंतर इतर रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी कोणताही खर्च  एमजीएम व्यवस्थापन आकारत नाही. रविवारी घडलेल्या  घटनेदरम्यान तेथे १०८ ची रुग्णवाहिका उपलब्ध होती. अपघाताच्या घटनेनंतर जी कोणी व्यक्ती रुग्णांसोबत असेल त्याचे काम संबंधित रुग्णाचे केसपेपर काढणे हे आहे. हा नियम सर्वच रुग्णालयांमध्ये आहे.  त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास वेळ झाला असे म्हणता येणार नाही. काही सोपस्कार पूर्ण पाडावेच लागतात.